"दिसता क्षणी गोळ्या घाला"; बांगलादेशात हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 10:43 AM2024-07-21T10:43:05+5:302024-07-21T10:50:49+5:30

बांगलादेशात हिंसक आंदोलनानंत आता देशव्यापी कर्फ्यू आणि "शूट-ऑन-साइट" आदेश लागू केले आहेत.

Chaos over quota in Bangladesh shoot at sight orders issued | "दिसता क्षणी गोळ्या घाला"; बांगलादेशात हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारचे आदेश

"दिसता क्षणी गोळ्या घाला"; बांगलादेशात हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारचे आदेश

Bangladesh Violence Protests :बांगलादेशातआरक्षणाविरोधात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत शेकडो तरुणांचा मृत्यू झालाय. लष्कर तैनात करून आणि देशभर संचारबंदी लागू करूनही बांगलादेशात परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे आता सरकारने कठोर पाऊल उचललं आहे. हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता थेट दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

बांगलादेश गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धुमसत आहे. बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून हिंसाचार भडकला. देशाच्या विविध भागात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १३३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी देशभरात कडक संचारबंदी लागू केली आणि राष्ट्रीय राजधानी ढाक्याच्या विविध भागात लष्करी दलांनी तळ ठोकला आहे. दुसरीकडे, पोलिसांना पाहताच गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहून पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय लष्करालाही पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. नागरी सेवेतील नोकऱ्यांमधील कोटा रद्द करण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय रविवारी निकाल देणार आहे. गुरुवारी, आंदोलक विद्यार्थ्यांनी देशात संपूर्ण बंद लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा २२ जणांचा मृत्यू झाला होता.

आंदोलन कशासाठी?

बांगलादेशातील हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाची मागणी आणि विरोध हा आहे. १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या लोकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेले आरक्षण कायम ठेवावे, अशी आंदोलकांच्या एका गटाची मागणी आहे. तर दुसरी गट सरकारी नोकऱ्यांमध्ये हा प्रकार सुरू ठेवण्याच्या विरोधात आहे. हे आरक्षण रद्द झाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे बांगलादेशात सातत्याने हिंसाचार होत आहे.

Web Title: Chaos over quota in Bangladesh shoot at sight orders issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.