पोपच्या सल्लागारावर व्यभिचाराचे आरोप
By admin | Published: June 30, 2017 12:38 AM2017-06-30T00:38:05+5:302017-06-30T00:38:05+5:30
कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वरिष्ठ वित्तीय सल्लागार आणि आॅस्ट्रेलियातील कॅथलिक चर्चचे ज्येष्ठ
सिडनी : कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वरिष्ठ वित्तीय सल्लागार आणि आॅस्ट्रेलियातील कॅथलिक चर्चचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्डिनल जॉर्ज पेल यांच्याविरुद्ध आॅस्ट्रेलियन पोलिसांनी बाललैंगिक शोषणाचा आरोप ठेवून तपास सुरू केला आहे.
व्हिक्टोरिया राज्याचे पोलीस उपायुक्त शेन पॅटन यांनी सांगितले की, कार्डिनल पेल यांच्याविरुद्ध मेलबर्न दंडाधिकारी कार्यालयात आरोपपत्र दाखल झाले असून पेल यांना १८ जुलै रोजी हजर होण्याचे समन्स काढले आहे. या घटना जुन्या आहेत व संबंधितांनी त्याच्या तक्रारी आता केल्या आहेत, असे ते म्हणाले.
७२ वर्षांच्या कार्डिनल पेल यांचे वास्तव्य व्हॅटिकन, रोम येथे आहे. एक निवेदन प्रसिद्ध करून या आरोपांना सामोरे जाण्यासाठी आपण लवकर आॅस्ट्रेलियात येऊ व आरोप खोडसाळ व निराधार असल्याचे न्यायालयात सिद्ध करू, असे पेल म्हणाले.
याआधी आॅस्ट्रेलियात पेल मेलबर्नचे व नंतर सिडनीचे आर्चबिशप होते. त्यांच्या क्षेत्रातील अनेक धर्मगुरूंवर असेच आरोप झाले होते. पेल यांनी त्यांची चौकशी पक्षपातीपणाने करून चर्चचे नाव खराब होऊ नये म्हणून धर्मगुरूंना पाठीशी घातले, असे आरोप त्या वेळी झाले होते. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलिया आणि व्हॅटिकन यांच्यात कैदी प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे समन्सनुसार कार्डिनल पेल आले नाहीत तर त्यांना खटल्यासाठी कसे आणायचे हा प्रश्न आहे.
शिवाय जगभर कॅथलिक चर्चवर लैंगिक शोषणाचे व त्यावर पांघरूण घालण्याचे वाढते आरोप झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी यापुढे असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असे जाहीर केले होते.
त्यामुळे आता स्वत:च्या निकटवर्ती उच्चपदस्थ वर्तुळात असलेल्या कार्डिनल पेल यांच्या प्रकरणात पोप काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्त्वाचे आहे.