छोटा राजन म्हणतो, भारतात परतायचेय
By admin | Published: October 29, 2015 10:12 PM2015-10-29T22:12:02+5:302015-10-29T22:12:02+5:30
पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त फेटाळून लावत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने तो भारतात परतू इच्छित असल्याचे म्हटले आहे.
बाली (इंडोनेशिया) : पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त फेटाळून लावत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने तो भारतात परतू इच्छित असल्याचे म्हटले आहे.
‘दाऊद इब्राहीमसह इतर शत्रू टोळ्यांकडून जिवाला धोका असल्याने भारतीय गुप्तचरांशी करार करून तू आत्मसमर्पण केल्याचे बोलले जाते. त्यात तथ्य आहे का’, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर ‘मी शरण आलो नाही’, असे उत्तर राजनने दिले. दाऊदची भीती वाटत नसल्याचाही त्याने पुुनरुच्चार केला. मला येथे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ते मला साखळदंडांनी जखडून ठेवतात. मला भारतात परतायचे आहे, असे तो म्हणाला. राजेंद्र सदाशिव निकाळजे असे राजनचे खरे नाव असून तो ५५ वर्षांचा आहे.
छोटा राजनचे झिम्बाब्वेत व्यवसाय असल्याचे बोलले जाते. इंडोनेशियात अटक झाल्यानंतर तो मला झिम्बाब्वेला जाऊ द्या, अशी विनवणी करत होता, असे वृत्त आले होते. राजनने हे वृत्त फेटाळून लावले. मी झिम्बाब्वेला जाऊ इच्छित नाही, असे तो म्हणाला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा एकेकाळी उजवा हात असणारा राजन नंतर त्याचा क्रमांक एकचा शत्रू झाला. दाऊद हा १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. मी दाऊदला भीत नाही. मी सीबीआय कधी येथे येते याची प्रतीक्षा करत आहे, असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)