अमेरिकेतला कोंबडीचोर...! तीन तासांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला, एक्स गर्लफ्रेंडची पाळलेली कोंबडी घेऊन पळाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:56 IST2025-04-05T16:56:42+5:302025-04-05T16:56:51+5:30
Social Viral: घरातील कोंबडी पळविल्याचे लक्षात येतच तिने काऊंटी शेरीफला 911 वर कॉल करून माहिती दिली.

अमेरिकेतला कोंबडीचोर...! तीन तासांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला, एक्स गर्लफ्रेंडची पाळलेली कोंबडी घेऊन पळाला...
अमेरिकेतल्या एका गुन्हेगाराचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. तो काही तासांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तिथून तो थेट त्याच्या एक्स गर्लफ्रेंडकडे गेला, तिच्या घरात घुसून त्याने तिची पाळलेली कोंबडी पळविली. आता या व्यक्तीला एक्स गर्लफ्रेंडची कोंबडी पळविणे चांगलेच महागात पडणार आहे. पोलिसांनुसार त्याला या गुन्ह्यासाठी १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
घरातील कोंबडी पळविल्याचे लक्षात येतच तिने काऊंटी शेरीफला 911 वर कॉल करून माहिती दिली. लगेचच पोलिसांची करोडो रुपयांची कार कोंबडीचोर एक्स बॉयफ्रेंडच्या मागे लागली. त्याला एका जंगल भागातून रस्त्याकडेवरून अटक करण्यात आली. बंदुकीचा धाक दाखवून त्याला पकडण्यात आले. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे.
तेथील पोलिसांकडील असलेल्या बॉडीकॅमचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले आहेत. यात तो जंगल भागातील रस्त्यावर कोंबडीला काखेत घेऊन दिसत आहे. फुटेजमध्ये तो रडताना दिसत आहे. माझ्या कोंबडीला काही करू नका, असे तो म्हणत आहे. आता त्याच्या एक्सने ती कोंबडी तिची आवडती होती असे पोलिसांना म्हटले आहे. तर तो देखील ही कोंबडी मला आवडते असे सांगत आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार ती कोंबडी एक्स गर्लफ्रेंडच्या ताब्यात दिली आहे.
संरक्षण आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले होते. सकाळीच तो सुटून आला होता. ब्रेकअपनंतर त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता आणि कदाचित याच रागात तिने कोंबडी चोरण्याचा कट रचला असेल, अशी तक्रार त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने दिली आहे. शेरीफच्या कार्यालयाने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. अमेरिकन कायद्यात अशा कृत्यांसाठी ७ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.