मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार बनला प्रमुख पाहुणा
By admin | Published: May 4, 2014 02:17 PM2014-05-04T14:17:50+5:302014-05-04T14:21:44+5:30
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला पाकिस्तानमधील वकिलांच्या बार असोसिएशनने प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याची संतप्त घटना समोर आली आहे.
ऑनलाइन टीम
लाहोर, दि. ४ - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला पाकिस्तानमधील वकिलांच्या बार असोसिएशनने प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याची संतप्त घटना समोर आली आहे. या विरोधात पाकिस्तानमधील वकिलांनीच उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयातील बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जमात ए दावा या संघटनेचे प्रमुख व मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार हाफीज सईदला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात सईदने भारतातील निवडणूक, आयएसआयची भूमिका, काश्मीर प्रश्न, पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमे अशा विविध विषयांवर भाषण दिल्याचे जमात ए दावा संघटनेचे प्रवक्ते आसीफ खुर्शीद यांनी सांगितले.
मात्र वकिल संघटनेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिबंध असलेल्या व दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या सईदला बोलवल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. लाहोर उच्च न्यायालयातील काही ज्येष्ठ वकिलांनीच या कृतीचा निषेध दर्शवला आहे. सईदला बोलवून वकिल संघटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर काय संदेश द्यायचा आहे असा प्रश्नच एका वकिलाने उपस्थित केला आहे. वकिल संघटना सईदला राष्ट्रीय नेता मानतात असा चुकीचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल अशी भितीही एका वकिलाने वर्तवली आहे.