भारतविरोधी कसुरींचा कार्यक्रम बंद पाडून मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा - शिवसेना
By Admin | Published: October 12, 2015 04:19 PM2015-10-12T16:19:56+5:302015-10-12T16:28:14+5:30
भारतविरोधी कारवाया खपवल्या जाणार नाहीत हे सांगणा-या मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा आणि हा कार्यक्रम होऊ देऊ नये अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे
>ऑनलाइन लोकमत
भारतविरोधी कारवाया खपवल्या जाणार नाहीत हे सांगणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या भारतविरोधी कारवाया सांगितल्या आहेत. आणि आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि हा कार्यक्रम होऊ देऊ नये अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
कसुरी यांनी परराष्ट्रमंत्री असताना हुरीयत या फुटीरतावादी चळवळीला पाठिंबा दिला होता. तुम्ही भारतविरोधी कारवाया सुरू ठेवा त्यामुळे आम्हाला काश्मिरप्रश्न चांगला हाताळता येईल असं हुरीयतला सांगणारे कसुरी हे भारतविरोधी आहेत. त्यांची शांतीची भाषा इथे असते, परंतु ते पाकिस्तानात असताना ते वेगळी भाषा बोलतात असं सांगत या कार्यक्रमाला शिवसेनेेचा विरोध कायम राहणार हे राऊत यांनी सांगितले. जोपर्यंत पाकिस्तान रक्तपात थांबवत नाही, धमक्या देणं बंद करत नाही, हिंसाचार बंद करत नाही तोपर्यंत शिवसेना पाकिस्तानी नेते, कलाकार, खेळाडू यांना विरोध करतच राहणार हे संजय राऊत यांनी सांगितले. ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असून ती मी फक्त मांडत आहे असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना संध्याकाळी नक्की काय करणार हे काही प्रसारमाध्यमांना विचारून अथवा सांगून करत नाही असं सांगत शिवसेना विरोध करणार म्हणजे नक्की काय करणार हे सांगण्यास राऊत यांनी नकार दिला. सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप करत राऊत यांनी त्यांच्यावर करण्यात आलेला हल्ला अत्यंत सौम्य व लोकशाहीला अनुसरून होता असं सांगितले.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमधले महत्त्वाचे मुद्दे:
- नवाझ शरीफ आले किंवा गेले तरी शिवसेनेला फरक पडत नाही.
- जोपर्यंत पाकिस्तानचं वाकडं शेपूट सरळ होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी संबंध ठेऊ नये हीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती आणि यापुढेही शिवसेनेची तीच भूमिका राहील.
- शिवसेना काय करणार आहे वा काय करणार नाही हे मीडियाला विचारून ठरवले जात नाही. आज सकाळचा कार्यक्रमही मीडियाला विचारून केला नव्हता.
- हा आमचा राजकीय अजेंडा नाही, देशभक्ती व देशप्रेमातून आमचा हा विरोध आहे.
- जोपर्यंत पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करणं, आपल्या हिंसक कारवाया थांबवत नाही तोपर्यंत शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकार, क्रिकेटपटू, नेते या सर्वांना प्रखर विरोध कायम राहील.
- मुंबईत येऊन निरपराधांचे मुडदे पाडणा-या, भारतविरोधी कारवाई करणा-या, भारताची शकले करण्याची भाषा करणा-या लोकांना अतिथीचा दर्जा दिला पाहिजे का? जे असं करत आहेत, ते देशद्रोही आहेत.
- पाकिस्तानविरोधातील शिवसेनेच्या भूमिकेत तसूभरही फरक पडलेला नाही.
- कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा प्रखर विरोध कायम.
- शांतीदूत असल्याचा आव आणणारे कसुरी हे नक्राश्रू ढाळत आहेत.
- भारतविरोधी पाकिस्तानी नेत्यांना भारतात येऊ न देण्याची आमची भूमिका जुनी आहे आणि ती कायम आहे. कसुरींच्या कारवायांना उत्तर म्हणून वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी आरपार की लढाईची भाषा केली होती. त्यामुळे कसुरींच्या कार्यक्रमाला आमचा विरोध आहेच.
- कसुरी हे परराष्ट्रमंत्री असताना सतत भारतविरोधी कारवाया करत होते. तुम्ही भारतविरोधी भूमिका घेत रहा, तर आम्हाला काश्मिरप्रश्न हाताळणे सोपे जाईल असे ते सातत्याने हुरीयतच्या नेत्यांना सांगत होते. हा सगळा पुरावा आम्ही मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आता राष्ट्रविरोधी कारवाया खपवणार नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि हा कार्यक्रम होऊ देऊ नये.
- पाकिस्तानचे नेते कसुरी हे भारतविरोधी असल्याचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना देत असून त्यांचा कार्यक्रम आयोजित करणारे सुधींद्र कुलकर्णी पाकिस्तानचे एजंट आहेत.
- मुख्यमंत्र्यांकडून कठोर भूमिकेची अपेक्षा.
- गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेने पाकिस्तानच्या हिंसेला, दहशतवादाला विरोध दर्शवला आहे.
- शिवसेनेने कसुरी यांच्याविरोधातील आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त चुकीचे.