दोन वर्षांखालील मुलांना टीव्ही पाहण्यास बंदी, स्वीडनमध्ये प्रत्येक वयाच्या मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:05 AM2024-09-04T09:05:59+5:302024-09-04T09:11:10+5:30
Guidelines For children In Sweden: भारतामध्ये १ वर्षाचे लहान मूल रडायला लागले तरीही त्याच्या हातात मोबाइल देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, विकसित असलेल्या स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.
स्टॉकहोम - भारतामध्ये १ वर्षाचे लहान मूल रडायला लागले तरीही त्याच्या हातात मोबाइल देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, विकसित असलेल्या स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.
देशाच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या मते, स्क्रीनचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत असल्याने लहान मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजनपासून पूर्णपणे दूर ठेवले पाहिजे. ऑन-स्क्रीन वेळ कमी करण्याच्या या शिफारसी फक्त लहान मुलांसाठी नाहीत तर इतर वयोगटांसाठी स्क्रीन टाइम नियंत्रित करण्याची सरकारची इच्छा आहे.
१३ ते १६ वयोगटातील स्वीडिश किशोरवयीन मुले शाळेबाहेर पडल्यानंतर दररोज सरासरी साडेसहा तास मोबाइल, टीव्हीवर घालवत आहेत. ८ तासांपेक्षा अधिक वेळ स्क्रीनवर अमेरिकेतील किशोरवयीन मुले घालवत आहेत.
मार्गदर्शक तत्त्वे काय?
दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्हीपासून दूर ठेवावे.
दोन ते पाच वयोगटातील मुलांना दररोज एक तासापेक्षा जास्त स्क्रीन पाहण्यास देऊ नये.
सहा ते बारा वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाइम दररोज एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित असावा.
तेरा ते अठरा वयोगटातील मुलांनी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त स्क्रीन वापरता कामा नये.
बेडरूममधून बाहेर ठेवा मोबाइल
- सरकारच्या मते, नवीन मार्गदर्शक तत्त्वे मुलांमधील स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न आहे. मार्गदर्शक तत्त्वे केवळ स्क्रीन टाइम कमी करण्याबद्दल नसून, सवयी बदलण्याबद्दलदेखील आहेत.
- झोपण्यापूर्वी फोन, टीव्ही पाहू नये तसेच रात्री फोन आणि टॅबलेट त्यांच्या मुलांच्या बेडरूममधून बाहेर ठेवावा, अशीही शिफारस सरकारने केली आहे.
मोबाइल, टीव्हीने काय होतेय?
- कौटुंबिक संवाद कमी झाला आहे.
- शारीरिक व्यायाम बंद झाला आहे.
- पुरेशी झोप होत नाही.
- सतत रील्स, शॉर्ट्स पाहिल्याने मानसिक परिणाम
- अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण