Video - अग्निकल्लोळ! चिलीच्या जंगलात भीषण आग; 46 जणांचा मृत्यू, हजारो घरं जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 10:22 AM2024-02-04T10:22:22+5:302024-02-04T10:29:24+5:30
चिलीमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. जंगलातील आगीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चिलीच्या जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य आणि दक्षिण चिलीमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. जंगलातील आगीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीम खबरदारीचा उपाय म्हणून जळालेल्या घरांमध्ये शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील आग पसरत असल्याने धोका आणखी वाढला आहे. भीषण आग पाहता चिली सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. चिलीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितलं की, सध्या देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील 92 जंगलांना आग लागली आहे, जेथे या आठवड्यात तापमान खूप वाढले आहे.
1100 घरं जळून खाक
दाट लोकवस्तीच्या परिसरात जंगलातील भीषण आग पसरल्याने जवळपास 1100 घरं जळून खाक झाली. सर्वात भीषण आग वालपराइसो परिसरात लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांची हालचाल सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं.
🇨🇱 Chile 🔥🔥 pic.twitter.com/RZkasvluQi
— Tuca (Arthur) (@tucabr54) February 4, 2024
वालपराइसो परिसरात तीन निवारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. चिलीच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 19 हेलिकॉप्टर आणि 450 हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे.
गेब्रिएल बोरिक यांनी देशाला संबोधित करताना किमान 46 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे कारण वालपराइसो प्रदेशात चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. चिलीवासियांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं. आग वेगाने पसरत असून हवामानामुळे आग आटोक्यात आणणं कठीण झाले आहे. तापमान जास्त आहे असं म्हटलं आहे.