चीन पाकवर पुन्हा मेहेरबान; अतिरेक्यावरील निर्बंध रोखले; संयुक्त राष्ट्रांत भारत व अमेरिकेने मांडला हाेता प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 09:42 AM2022-08-12T09:42:46+5:302022-08-12T09:45:01+5:30
संयुक्त राष्ट्रांत भारत व अमेरिकेने मांडला हाेता प्रस्ताव
वॉशिंग्टन : पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या अब्दुल रौफ अझर या दहशतवाद्यावर निर्बंध घालण्याच्या भारत व अमेरिकेने सादर केलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील १५ पैकी १४ सदस्यांनी बुधवारी मंजुरी देण्याचे ठरविले. एकट्या चीननेच या प्रस्तावाला विरोध करून पाकिस्तानची पाठराखण केली. तसेच हा प्रस्ताव राखून ठेवला.
कंदाहार येथे इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणामागे अब्दुल रौफ अझर सूत्रधार होता, असा आरोप आहे. अब्दुल रौफ अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करावे, त्याच्या विदेश प्रवासावर बंदी घालावी, तसेच त्याची मालमत्ता गोठवावी अशा तरतुदी भारत व अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत सादर केलेल्या प्रस्तावात आहेत. या समितीमध्ये १५ सदस्य असून चीन कायमस्वरूपी सदस्य आहे. चीनने व्हेटो वापरून हा प्रस्ताव राखून ठेवला.
चीनने सांगितले की, सुरक्षा समितीच्या बैठकीत असे अनेक प्रस्ताव याआधी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात अब्दुल रौफ अझरबाबतचा देखील प्रस्ताव आहे. सुरक्षा समितीच्या कामकाजाचे नियम पाळून चीनने या प्रस्तावाबाबत भूमिका घेतली आहे.
अब्दुल रौफ अझर या दहशतवाद्यावर अमेरिकेने २०१० सालापासून निर्बंध घातले.
पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी मार्गाकडे वळविण्याचा तसेच भारतात घातपाती हल्ले करण्याचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने अब्दुलवर ठेवला आहे. १९९९ साली कंदाहार येथून इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले, २००१ साली भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला, २०१६ रोजी पठाणकोट येथील हवाई दलाच्या छावणीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या कारवायांमागे अब्दुल रौफ अझर हाच सूत्रधार होता, असा आरोप आहे. (वृत्तसंस्था)
चीनवर भारताची तीव्र नाराजी
दहशतवाद्यांशी संबंधित प्रस्ताव सुरक्षा समितीत मांडले गेल्यानंतर ते कोणतेही स्पष्टीकरण न देता राखून ठेवण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी मंगळवारी म्हटले होते. हे वक्तव्य म्हणजे भारताने चीनबाबत व्यक्त केलेली नाराजी होती.