डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडला; आता चीननं दिला अमेरिकेला दणका, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:08 IST2025-02-04T14:07:38+5:302025-02-04T14:08:16+5:30
सध्या अमेरिकेने मॅक्सिको आणि कॅनडा यांच्यावरील २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय पुढील ३० दिवसांसाठी स्थगित केला आहे. मात्र चीनला यातून दिलासा दिला नाही

डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडला; आता चीननं दिला अमेरिकेला दणका, काय घडलं?
जगातील २ सुपरपॉवर देश अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ वॉर सुरू झालं आहे. एकीकडे शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरून येणाऱ्या सामानांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चीनला झटका बसला. आता चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देत अमेरिकन उत्पादनावर नव्याने टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेलाही त्याचा फटका बसणार आहे.
चीनकडून अमेरिकन उत्पादनावर शुल्क आकारण्यात येणार आहे. पीटीआयनुसार, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने ही खेळी खेळली आहे. चीनमध्ये अमेरिकन उत्पादनावर यापुढे १० ते १५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय झाला आहे. त्यात अमेरिकेतून येणाऱ्या बड्या कार, पिकअप ट्रक, कच्चे तेल, एलएनजी, कृषी उपकरणे यावर अमेरिकेच्या निर्यातीवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. चीनने अमेरिकेतून मागवण्यात येणाऱ्या कोळसा, एलएनजीवर १५ टक्के टॅरिफ लावले आहे. तर कृषी उपकरणे, पिकअप ट्रॅक, वाहने यावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय अमेरिकेतून येणाऱ्या काही प्रमुख खनिजांवरही नियंत्रण लावण्यात येणार आहे.
Google वरही कठोर निर्बंध येणार
PTI रिपोर्टनुसार, चीनने अमेरिकेतली टेक जायंट कंपनी Google वरही कठोर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे. चीन गुगलवर विश्वासघातविरोधी कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपाची चौकशी करणार आहे. चीनमध्ये स्टेट एडिमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेगुलेशन याविरोधात तपास करत आहे.
दरम्यान, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफविरोधात वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनायझेशनमध्ये याचिका दाखल करणार असल्याचं चीनच्या कॉमर्स मिनिस्ट्री अँन्ड कस्टम विभागाने सांगितले. सध्या अमेरिकेने मॅक्सिको आणि कॅनडा यांच्यावरील २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय पुढील ३० दिवसांसाठी स्थगित केला आहे. मात्र चीनला यातून दिलासा दिला नाही. टॅरिफ लावल्याने अमेरिकेत महागाई वाढू शकते हे ट्रम्प यांनी मान्य केले असले तरी अवैध प्रवासी वाहतूक, ड्रग्स वाहतूक आणि देशातंर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी हे गरजेचे असल्याचं ट्रम्प यांनी सांगितले.