मोठमोठे रबरी तंबू ठोकून चीन करतोय मोठ्या हल्ल्याची तयारी; संपूर्ण भारत ड्रॅगनच्या टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:31 PM2021-07-29T19:31:29+5:302021-07-29T19:33:29+5:30
वाळवंटी भागात भुयारं खणण्याचं काम जोरात सुरू; चीनकडून रचण्यात येतोय मोठा कट
बीजिंग: लडाखच्या सीमावर्ती भागात वारंवार कुरघोड्या करणाऱ्या चीननं आता मोठा कट रचण्यास सुरुवात केली आहे. बीजिंगपासून २ हजार किलोमीटर पश्चिमेला असलेल्या वाळवंटी प्रदेशात चिनी सरकारनं जागोजागी खोदकाम सुरू केलं आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या (आयसीबीएम) माध्यमातून अण्वस्त्र डागण्यासाठीची यंत्रणा चीनकडून विकसित केली जात आहे.
वायव्य चीनमधील युमेन प्रांताच्या जवळ असलेल्या वाळवंटात चीन ११० पेक्षा अधिक भुयार तयार करत आहे. या भुयाराला सायलो, तर एकाच भागात अनेक भुयारं असल्यास सायलो फिल्ड म्हटलं जातं. या भागातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागता येतात. त्यांची मारक क्षमता ५ हजार ५०० किलोमीटरहून अधिक असेल. चीनच्या या व्यापक कटाची माहिती व्यवसायिक उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून समोर आली आहे.
काही आठवड्यांपूर्वीदेखील अशाच प्रकारच्या आणखी एका ठिकाणाची माहिती पुढे आली होती. त्या भागातही अण्वस्त्र डागण्यासाठी १०० हून अधिक सायलोज तयार करण्यात आल्याचं उघडकीस आलं. हा भाग युमेनपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळवंटी प्रदेशात आहे. या भागातून चीन आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागू शकतो. विशेष म्हणजे या भारतासह संपूर्ण जग या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येतं.
नुकतंच समोर आलेलं सायलो फिल्ड चीनच्या झिंजियांग प्रांताच्या पूर्वेला आहे. हा परिसर हामी शहरातील कुख्यात रिएज्युकेशन शिबिरांपासून जवळच आहे. गेल्याच आठवड्यात द फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्टनं 'प्लॅनेट लॅब्स सॅटेलाईट्स'च्या फोटोंच्या माध्यमातून सायलो फिल्डचा शोध घेतला. फेडरेशननं हे फोटो न्यूयॉर्क टाईम्सलादेखील दिली होती.