China: आता ३ वर्षांच्या मुलांचंही होणार कोरोना लसीकरण, चीननं दिली मंजुरी; ठरला जगातील पहिला देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:48 PM2021-06-06T15:48:06+5:302021-06-06T15:49:03+5:30
चीनमध्ये आता ३ वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना विरोधी लसीला चीननं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
चीनमध्ये आता ३ वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना विरोधी लसीला चीननं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ३ वर्षांपासूनच्या मुलांना कोरोना विरोधी लस देणारा चीन जगातील पहिला देश ठरणार आहे. चीनमध्ये आता ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना सिनोवॅक बायोटेकची लस देण्यात येणार आहे. चीनमध्ये सध्या १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनाच कोरोनाची लस देण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम प्रत्येक देशाकडून राबविण्यात येत आहे. चीनमधील सरकारी माध्यमांना एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे चेअरमन यिन वीडोंग यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, चीन सरकारनं अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबतची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. चीनच्या लसीकरण मोहीमेची जबाबदारी असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
लसीच्या चाचण्या यशस्वी
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सिनोवॅक लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यात लहान मुलांच्या शरीरात कोरोना विरोधी अँटीबॉडी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यासोबतच लसीचे कोणतेही दुष्परिणाम देखील लहान मुलांमध्ये आढळून आलेले नाहीत. पहिला डोस घेतल्यानंतर मुलांमध्ये एका आठवड्याच्या आत १० पट अँटीबॉडी तयार होत असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. तर १५ दिवसांनी यात वाढ होऊन हेच प्रमाण २० पट होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.