ड्रॅगन आग ओकतोय! चीनकडे सूर्याहून अधिक ताकदवान 'कृत्रिम सूर्य'; तापमान ११९९९९८२ डिग्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 11:13 AM2021-06-03T11:13:45+5:302021-06-03T11:15:36+5:30
चीननं तयार केलेला कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली
चीनमधून कोरोनाचा विषाणू जगभरात पोहोचला. कोरोना संकटामुळे जगात लाखो जणांचा बळी गेला. देशांच्या अर्थव्यवस्था गाळात गेल्या. मात्र ज्या चीनमधून कोरोनाचा विषाणू जगात सर्वदूर पोहोचला, तिथे आता सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला कृत्रिम सूर्य आता आणखी आग ओकू लागला आहे. विशेष म्हणजे हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली आहे.
चीनचा कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा जास्त प्रकाश आणि ऊर्जा देईल. मिरर नावाच्या संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्यानुसार कृत्रिम सूर्याचं तापमान तो सक्रिय होताच खऱ्या सूर्याच्या तुलनेत १० पट अधिक होतं. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, कृत्रिम सूर्य जवळपास १०० सेकंद खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक उष्ण होता. याआधी कृत्रिम सूर्याचं तापमान १६ कोटी डिग्री सेल्सियसवरदेखील गेलं होतं. कृत्रिम सूर्याचं तापमान १२ कोटी डिग्री सेल्सियसवर जाणं मोठं यश असल्याचं चिनी शास्त्रज्ञांनी सांगितलं.
कृत्रिम सूर्याच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञांनी आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. याआधी कृत्रिम सूर्याचं तापमान सलग १०० सेकंद १० कोटी डिग्री सेल्सियसवर ठेवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं होतं. मात्र आता शास्त्रज्ञांनी हेच तापमान १६ कोटी डिग्री सेल्सिअसवर नेण्यात यश मिळवलं आहे. आता यापुढे रिऍक्टरचं लक्ष्य एक आठवडा तापमान स्थिर ठेवणं असेल, अशी माहिती शेन्जेनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिक विभागाचे संचालक ली मियाओ यांनी दिली. आमच्या हाती आलेलं यश खूप मोठं आहे. यापुढे हेच तापमान बराच कालावधीसाठी स्थिर ठेवणं आमचं उद्दिष्ट असेल असं ली यांनी सांगितलं.