चीनमधून कोरोनासंदर्भातील सर्वात मोठी बातमी, आज रात्री हुबेईतील लॉकडाउन उठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:11 PM2020-03-24T14:11:14+5:302020-03-24T14:19:19+5:30
संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता, भारतात आतापर्यंत 492 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढलून आले आहे.
वुहान : सर्व जगात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच चीनमधून एक मोठी बातमी आली आहे. कोरोनाच्या धास्तीने हुबेई प्रांतात लागू केलेले लॉकडाऊन चीन मंगलवारी रात्री उठवणार आहे. मात्र, असे असले तरी वुहानमध्ये 8 एप्रिलपर्यंत लॉकडाउन सुरूच राहणार आहे. चीनमध्ये आता कोरोनाचे नवीन रुग्ण आढळणे बंद झाल्याने चीनने हा निर्णय घेतला आहे.
चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील तब्बल 185 हून अधिक देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. मात्र, असे असतानाच, गेल्या काही आठवड्यांत चीनमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. जागतीक पातळीवर मात्र हा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. याशिवाय परदेशातून परतणाऱ्या चीनी नागरिकांना कोरोना झाल्याचे आढळून येत आहे.
संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता, भारतात आतापर्यंत 492 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढलून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी 34 रुग्ण पूर्ण पणे बरे झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार इटलीमध्ये सोमवारी कोरोणा व्हायरसमुळे आणखी 602 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 6,078वर पोहोचला आहे.
कोरोनापासून जीव वाचवण्यासाठी 50 देशांमधील सरकारांनी सुमारे 100 कोटीपेंक्षा जास्त लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी जगातील ३५ देशांनी लॉकडाउनची घोषणाही केली आहे. अनेक देशांनी तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद केली असून देशांतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे. संपर्क आणि संसर्गामुळे करोना होत असल्याने तो रोखण्यासाठी जगभरातील सर्व देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.