चीनची नवी चाल, भारताचं वाढलं 'टेन्शन'; सीमेवरील डोंगराळ भागात वसवली तीन गावं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 03:50 PM2024-02-20T15:50:07+5:302024-02-20T15:50:51+5:30
तीन पैकी एका गावात काही चीनी नागरिक राहण्यास सुरूवात झाल्याची माहिती
China in Bhutan, India: भारत आणि चीन या दोन देशांमधील राजकीय संबंध काही अंशी तणावाचे आहेत. असे असतानाच चीनने एक नवी चाल खेळली असून त्याने भारताचे टेन्शन वाढल्याचे दिसत आहे. चीन आणि भूतान या देशांमध्ये सीमेवरील सुरक्षांच्या विविध मुद्द्यांवरून चर्चा व बैठका सुरू आहेत. असे असतानाच चीन भूतानच्या सीमेवरील विवादित भागात गावे बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. हाँगकाँगच्या 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने वृत्त दिले आहे की, दोन्ही देशांना विभागणाऱ्या डोंगराळ भागात चीनकडून किमान तीन गावे वसवण्यात आली आहेत. अहवालात सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, दारिद्र्य निर्मूलन योजनेसाठी या गावांचा जलद विस्तार करण्यात आला आहे तसेच ही योजना दुहेरी राष्ट्रीय सुरक्षेची भूमिका बजावते आहे. परंतु चीनचा भूतान सीमेवरील वाढता हस्तक्षेप भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकतो.
मिळालेल्या वृत्तानुसार, १८ चिनी नागरिक हिमालयातील एका दुर्गम गावात सीमावर्ती भागात नव्याने बांधलेल्या घरात प्रवेश करण्यासाठी थांबले होते. प्रत्येकाच्या हातात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोटो होता. हा फोटो इतका मोठा होता की त्यांचे फक्त डोके आणि पाय इतकाच भाग दिसत होता. त्यासोबतच, त्यांच्या मागे चमकदार लाल बॅनरवर चिनी आणि तिबेटी लिपीमध्ये त्यांचे स्वागत करणारे शब्दही लिहिण्यात आले होते.
हा भाग चीन आणि भूतान यांच्यातील वादाचा मुद्दा आहे. चीन भारत आणि भूतान या दोन्ही देशांच्या सीमेवर सुसज्ज गावे उभारण्याच्या आपल्या योजना पुढे रेटत आहे. तिबेट फेडरेशन ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सच्या निवेदनाचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, २८ डिसेंबर रोजी आलेल्या लोकांचा हा पहिला गट होता. अहवालानुसार, विवादित क्षेत्रामध्ये चीनने बांधलेल्या किमान तीन गावांपैकी हे केवळ एक गाव आहे.