स्टॉप चुकल्यानं महिलेला राग अनावर; बस चालकावरचा हल्ला बेतला 13 जणांच्या जिवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 07:59 AM2018-11-03T07:59:01+5:302018-11-03T08:00:59+5:30
चीनमधल्या एका बसमध्ये प्रवासी महिलेनं चालकावर हल्ला केला. त्यानंतर बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती दरीत कोसळली.
बीजिंग- चीनमधल्या एका बसमध्ये प्रवासी महिलेनं चालकावर हल्ला केला. त्यानंतर बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती दरीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. एक महिला कोणत्या तरी वस्तूनं चालकाच्या डोक्यावर प्रहार करत असल्याचं या व्हिडीओत दिसत असून, तिच्यावर हल्ला करण्यासाठी ती चालकालाही उकसवत असल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळतंय.
महिलेनं दुस-यांदा हल्ला केल्यानंतर चालकाचा स्वतःच्या बचावाच्या प्रयत्नात गाडीवरचा ताबा सुटला आणि बस रेलिंग तोडून थेट नदीत कोसळली. चीनमधल्या दक्षिण पश्चिम चॉगकांग शहरातील यांग्त्जी नदीच्या पुलावरून रेलिंग तोडून बस नदीत पडली. पोलिसांनी बस असलेल्या 13 मृतदेहांना नदीतून बाहेर काढलं आहे, तर दोन मृतदेह अद्यापही बेपत्ता आहेत. अपघातादरम्यान बसमध्ये 15 प्रवासी होते.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, 48 वर्षीय महिला प्रवाशीचा स्टॉप पाठी राहिल्यानं तिनं बसचालकाकडे बस थांबवण्याचा तगादा लावला होता. परंतु चालकाने बस थांबवण्यास नकार दिला. चालकानं मध्येच बस थांबवून तिला उतरवण्यास मज्जाव केल्यानं तिनं रागाच्या भरात चालकाला मारण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच दरम्यान चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर गाडी रेलिंग तोडून थेट नदीत गेली. या अपघातात बसमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.
Videos capture the moment a bus in SW China's Chongqing lost control after a driver-passenger fight and plunged into the Yangtze River on Oct. 28, killing 15 people aboard the bus. pic.twitter.com/GztFVgDMOM
— People's Daily,China (@PDChina) November 2, 2018