China: चीनचे हेरगिरी जहाज अचानक पोहोचले, भारताने अग्नी मिसाईलचे परीक्षण रोखले; दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 11:51 AM2022-11-08T11:51:51+5:302022-11-08T11:52:20+5:30
चीनच्या या जहाजावरून सध्या हिंदी महासागरात तणाव आहे. भारताने काही महिन्यांपूर्वीच आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी हेरगीरी जहाजाला घुसू देणार नाही, असा इशारा दिला होता.
भारताने बंगालच्या खाडीमध्ये प्रस्तावित असलेले अग्नी मिसाईलचे परीक्षण रोखले आहे. यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. चीनचे हेरगीरी करणारे जहाज यूआन वांग-6 पासूनचा धोका लक्षात घेत भारताने हा निर्णय घेतला आहे. चीनने इंडोनेशियाहून नेमक्या याच वेळी हे जहाज हिंदी महासागरात पाठविल्याने खळबळ उडाली आहे.
चीनच्या या जहाजावरून सध्या हिंदी महासागरात तणाव आहे. भारताने काही महिन्यांपूर्वीच आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी हेरगीरी जहाजाला घुसू देणार नाही, असा इशारा दिला होता. तरी देखील चीनच्या आणखी एक जहाजाने श्रीलंकेच्या किनाऱ्यावर हजेरी लावली होती.
ओपन सोर्स इंटेलिजेंस detresfa ने सांगितले की, भारताने प्रस्तावित मिसाईल परीक्षण रोखले आहे. यासाठी जी नोटीस जारी केली होती ती रद्द केली आहे. भारताने चीनच्या युआन वांग श्रेणीतील ट्रॅकिंग जहाजाच्या हिंदी महासागरातील उपस्थितीमुळे असे केले आहे.
चीनचे युआन वांग-6 हे हेरगीरी करणारे जहाज 22 हजार टनांचे आहे. यावर अँटेना, अत्याधुनिक पाळत ठेवणारी उपकरणे आणि सेन्सर्स आहेत. इलेक्ट्रॉनिक हेरगिरी, उपग्रह प्रक्षेपणांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या कक्षीय मार्गाचा मागोवा घेण्यासाठी हे जहाज ओळखले जाते. हे हेरगिरी जहाज शुक्रवारी सकाळपर्यंत इंडोनेशियातील बालीजवळ होते. चिनी जहाज PLA च्या स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सचा एक भाग आहे ज्यामध्ये 400 क्रू सदस्य आहेत. हे जहाज सुंदा सामुद्रधुनीमार्गे हिंदी महासागरात दाखल झाले आहे.
भारताने 10 आणि 11 नोव्हेंबरसाठी NOTAM किंवा नोटीस जारी करून बंगालच्या उपसागरात नो-फ्लाय झोन घोषित केले होते. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी घेणार होती.