China Coronavirus: चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ६३६ वर; ३१ हजारांपेक्षा अधिक लोकांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 05:00 AM2020-02-08T05:00:59+5:302020-02-08T06:26:23+5:30
चीनमधील १९ विदेशी नागरिकांनाही संसर्ग
बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बळी पडलेल्यांची संख्या ६३६ वर पोहोचली आहे. या विषाणूची लागण झालेले ७३ नवे रुग्ण वैद्यकीय तपासणीमध्ये आढळले आहेत. चीनमध्ये या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या ३१,१६१ झाली आहे.
चीनमध्ये कोरोनाग्रस्त असलेल्यांपैकी ७३ जण गुरुवारी मरण पावले. त्यामध्ये हुबेई प्रांत व वुहान शहरातील ६९ जण तसेच हैनान, हेनान, ग्वांगडाँग, जिलिन प्रांतात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या देशात वास्तव्यास असलेल्या १९ विदेशी नागरिकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, ते कोणत्या देशातील नागरिक आहेत याची माहिती चीनने जाहीर केलेली नाही. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी चीनने गुरुवारी १५०० खाटांचे एक रुग्णालय सुरू केले आहे. त्याआधी हजार खाटांचे एक रुग्णालय वुहानमध्ये सुरू करण्यात आले होते.
एअर इंडिया, इंडिगोसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी चीनला जाणारी आपली विमाने काही दिवसांसाठी रद्द केली आहेत. सध्याच्या काळात चीनला जाणे टाळा अशा सूचना भारतासह अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना दिल्या आहेत. जपानच्या समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस नावाच्या क्रूझमध्ये कोरोनाची लागण झालेल्या प्रवाशांची संख्या आता ६१ झाली आहे. या क्रूझमधील एक प्रवासी गेल्या आठवड्यात हाँगकाँगला उतरला. त्याची तपासणी केली असता तो कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या क्रूझमधील प्रवाशांपैकी २७३ जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. क्रूझवर कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आदी देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
डॉक्टरच्या मृत्यूची होणार चौकशी
कोरोनाच्या भीषण धोक्याबद्दल इशारा देणाऱ्या पहिल्या आठ डॉक्टरांपैकी डॉ. ली वेनलिआंग यांचा याच विषाणूने गुरुवारी बळी घेतला होता. या डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश चीन सरकारने दिले आहेत. ही चौकशी करण्यासाठी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने एक उच्चस्तरीय चौकशी समिती तातडीने वुहान शहरात पाठविली आहे.
कोरोना विषाणूच्या भीषण धोक्याबद्दल जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच इशारा देणाºया डॉ. ली वेनलिआंग यांच्यावर अफवा पसरविण्याचा आरोप ठेवून पोलिसांनी त्यांचा छळ केला, अशीही चर्चा होती.
कोरोनाच्या विळख्यातही चीनमध्ये मराठी तरुणाची ज्ञानसाधना चीनमध्ये मराठी विद्यार्थी सुखरूप
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे केंद्र असलेल्या वुहानमध्ये पीएच.डी. करणारा चंद्रदीप जाधव सुखरूप व अभ्यासात मग्न आहे. वुहानमधील जनजीवन पूर्ववत होईल. महिनाअखेरीस विद्यापीठ सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती चंद्रदीपने चीनमधून ‘लोकमत’ला दिली.
आर्थिक कारणामुळे चंद्रदीप जाधव व गिरीश पाटील या विद्यार्थ्यांनी मायदेशी येण्यास नकार दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. प्रत्यक्षात आम्ही असे सांगितले नसल्याचे स्पष्टीकरण चंद्रदीपने दिले. भारतीय विद्यार्थ्यांना परत येण्यासाठी दूतावासाने संपर्क साधला तेव्हा आम्ही विद्यापीठात सादर करण्यासाठी पत्र मागितले, ते मिळाले नाही, असेही चंद्रदीप म्हणाला. अशा पत्राची गरजच नव्हती, असे स्पष्टीकरण बीजिंगमधील भारतीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.
आम्हाला असाईनमेंट देण्यात आली आहे. वुहान विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठात विद्यार्थी त्यातच मग्न आहेत. आमच्यासंबंधी वृत्त प्रसिद्ध होताच फोन आले. काहींनी मदत देऊ केली. भारतीय दूतावासानेही संपर्क केला होता. आम्हीच वुहानमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला, असे चंंद्रदीप म्हणाला. आता त्यांना परत येता येईल का, यावर अधिकाºयाने ‘तूर्त शक्य नाही’ असे उत्तर दिले.
वुहान शहर असलेला हुबेई प्रांत बंद आहे. राजनैतिक संबंधांमुळे भारतीयांना मायदेशी आणण्याची मुभा भारताला चीनने तात्काळ दिली. भारत व मालदीवच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारने दिल्लीत आणले. परदेशी नागरिकांना प्राधान्याने मायदेशी पाठवल्यानंतर चीनने आता देशवासीयांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतात सध्या जाता येणार नाही, परवानगीलाही विलंब लागू शकतो.
महाराष्ट्रातील दोन्ही विद्यार्थी सुखरूप
बीजिंगस्थित भारतीय दूतावासातील एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वुहान विद्यापीठात पीएच.डी. करणाºया गिरीश पाटील (जळगाव) व चंद्रदीप जाधव (गाव- रामी, तालुका- दोंडाईचा, जिल्हा- धुळे) या मराठी विद्यार्थ्यांनी भारतात येण्यास नकार दिला होता. दोन्ही विद्यार्थी सुखरूप आहेत. विद्यापीठाने त्यांना पुरेशा सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीयच नव्हे तर सर्व परदेशी विद्यार्थ्यांची काळजी स्थानिक विद्यापीठ घेत आहे. चीनमध्ये कोरोनाची लागण होईलच, असे नाही. पुरेशी काळजी सर्वच ठिकाणी घेतली जात आहे.