चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा थैमान; रुग्णांना जागा मिळेना, स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 07:36 PM2022-12-20T19:36:10+5:302022-12-20T19:36:40+5:30
येत्या काही दिवसात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
बीजिंग: जगभरात कोरोना कमी झाला, पण या रोगाची सुरुवात जिथे झाली त्या चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर तिथं संसर्गाचा वेग झपाट्यानं वाढत असल्याचे पाहायला मिळतं आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रुग्णालयात रुग्णांना ठेवण्यासाठी खाटा पुरत नाहीयेत. राजधानी बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. अनेक ठिकाणी अंत्यविधीसाठी प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत.
10 लाख लोकांचा मृत्यू होणार
अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फीगेल-डिंग यांनी सोशल मीडियावर चीनचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक परिस्थइती दिसत आहे. कोरोनावर मोठा इशारा देताना ते म्हणाले की, 90 दिवसांत चीनची 60% लोकसंख्या आणि जगातील 10% लोकांना कोरोनाची लागण होईल. जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
एप्रिल 2023 मध्ये लाखो मृत्यूची भीती
नुकताच चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHMI) ने अंदाज व्यक्त केला आहे की, 2023 पर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. चीनमधील कोविड निर्बंध उठवल्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन हे अंदाज लावण्यात आले आहेत. आयएचएमआयचे संचालक क्रिस्टोफर मरे यांच्या मते, एप्रिलपर्यंत चीनच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असेल.
जगात केसेस वाढल्या, भारतात कमी
जगभरात कोरोनाची प्रकरणे वाढत असताना भारतात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (MoHFW) नुसार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत देशात एकूण 3490 सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक होते. आरोग्यमंत्र्यांनी 19 डिसेंबर रोजी संसदेत सांगितले होते की, भारतात लसीकरणाची संख्या 220 कोटींच्या पुढे गेली आहे. यात पहिला, दुसरा आणि सावधगिरीचा म्हणून घेतलेल्या तिसऱ्या डोसचा समावेश आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 18 जानेवारी 2021 रोजी देशात सुरू झाली होती.