CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! चीनमध्ये कंपनीने ऑफिसमध्ये 20,000 कर्मचाऱ्यांच्या राहण्याची केली सोय कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:25 PM2022-03-31T16:25:01+5:302022-03-31T16:35:44+5:30
CoronaVirus News : कोरोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण युरोपसहीत चीनमध्येही कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आर्थिक घडामोडींचं देशातील सर्वात महत्वाचं केंद्र असणाऱ्या शांघाईमध्येही सेमी लॉकडाऊन जारी करण्यात आला. कोरोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे.
चीनमधील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे. शांघाईमधील लुजियाझुई येथे जवळवजळ 20 हजार कर्मचारी, बँकर्स आणि व्यापारी त्यांच्या कार्यालयांमध्येच वास्तव्यास आहे. कंपनीमध्ये दिवसभर काम करुन नंतर लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये बाहेर पडता येत नसल्याने या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय कंपन्यांनी कामाच्या जागीच करुन दिली आहे. हजारोंच्या संख्येने स्लीपिंग बॅग मागवण्यात आल्यात. या कर्मचाऱ्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी चीनमध्ये कोरोनाचे 4 हजार 477 रुग्ण आढळून आले होते.
लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू बसू लागला आहे. शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंबंधी माहिती दिली आहे. नागरिकांना घरातच थांबावं लागणार असून इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी सामान चेक पॉइंटवर ठेवलं जाणार आहे. अत्यावश्यक नसणारी कार्यालयं आणि सर्व व्यवसाय बंद राहतील. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद केली जाणार आहे, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी शांघाई शहरातील काही भागात सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 26 मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक सेक्टर हे बंद करण्यात आले आहेत. जागोजागी बूथ तयार करण्यात आले असून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे शांघाईच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कोरोनामुळे शांघाईचं डिजनी थीम पार्क आधीपासूनच बंद आहे. शांघाईसह चीनच्या उत्तर पूर्वेत असेलल्या जिलिन प्रांतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात यावीत आणि आवश्यकता असेल त्या परिसरात ताबोडतोब लॉकडाऊन करावे.'