चीन करणार ५ लाख नोकऱ्यांची कपात
By Admin | Published: March 2, 2017 03:55 AM2017-03-02T03:55:42+5:302017-03-02T03:55:42+5:30
चीनने कोळसा आणि पोलाद यासह अन्य अवजड उद्योग क्षेत्रातील ५ लाख नोकऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीजिंग : आर्थिक मंदीचा फटका सहन करीत असलेल्या चीनने कोळसा आणि पोलाद यासह अन्य अवजड उद्योग क्षेत्रातील ५ लाख नोकऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनचे मनुष्यबळ विकास आणि सामाजिक सुरक्षामंत्री यीन वेईमीन यांनी ही घोषणा केली. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने या संबंधीचे वृत्त दिले आहे. वेईमीन यांनी सांगितले की, ‘यंदा नोकरी गमवावी लागलेल्या पाच लाख लोकांना अन्यत्र हलविण्याची योजना सरकारने आखली आहे. चीनचा बेरोजगारीचा दर यंदा ४.0२ टक्क्यांवर आहे. आर्थिक मंदी असतानाही तो निर्धारित लक्ष्याच्या मर्यादेतच आहे.’
जगातील एकूण पोलाद उत्पादनापैकी अर्धेअधिक पोलादाचे उत्पादन चीनमध्ये होते. जगातील पोलादाची मागणी कमी झाल्यामुळे राक्षसी क्षमता असलेला चीनमधील हा उद्योग संकटात सापडला आहे.
यीन यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षी शहरी भागात १३.१४ दशलक्ष नवे रोजगार दिले गेले. सरकारचे आकडे विश्वासार्ह आहेत. नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅस्टिक्सने केलेल्या सर्वेक्षणातूनही हीच आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये २0११ पासून सातत्याने मंदी आहे. त्यामुळे बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.’