चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर, नवीन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:07 AM2022-11-24T10:07:38+5:302022-11-24T11:04:52+5:30
China Coronavirus : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनमध्ये लॉकडाऊन, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरचा प्रादु्र्भाव दिसून येत आहे. गुरुवारी समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, चीनमध्ये महामारी सुरू झाल्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनमध्ये लॉकडाऊन, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
नॅशनल हेल्थ ब्युरोने सांगितले की, चीनमध्ये बुधवारी 31,454 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 27,517 मध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या पाहिली तर हा आकडा खूपच कमी असला तरी त्यामुळे चीनमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये चीनमध्ये 29,390 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. मात्र बुधवारच्या आकडेवारी पाहता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिलमध्ये, चीनच्या मेगासिटी शांघायमध्ये लॉकडाउन लादण्यात आले आणि तेथे लोकांसाठी वैद्यकीय सेवा आणि अन्नाची कमतरता होती.
चीनच्या झिरो कोव्हिड पॉलिसी अंतर्गत, किरकोळ कोरोनाचे रुग्ण आढळल्यास, संपूर्ण शहर लॉक डाऊन केले जाते आणि कोरोना पीडित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कडक क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. चीनमध्ये कोरोनाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. झिरो कोव्हिड पॉलिसीमुळे लोकांमध्ये संताप आहे. याबाबत लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. कोरोनामुळे चीनच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला आहे.
चाओयांगमध्ये सर्वाधिक प्रकरणे
गेल्या मंगळवारी बिजिंगमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. यानंतर अधिकाऱ्यांनी उद्याने, कार्यालयीन इमारती आणि शॉपिंग मॉल्स बंद करण्याचे आदेश दिले. बिजिंगचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला चाओयांग जिल्हा पूर्ण लॉकडाउनच्या जवळ पोहोचला आहे. तिथे लोकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे सांगण्यात आले आहे. चाओयांग जिल्ह्यात सुमारे 3.5 मिलियन लोक राहतात. कोरोनाच्या नवीन रुग्णांचा सर्वाधिक फटका इली भागात बसला आहे. सोमवारी बीजिंगमध्ये 1,400 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 783 प्रकरणे एकट्या चाओयांगमध्ये आढळली होती.