चीनला कशाची वाटतेय भीती?, अचानक बदलला मोठा निर्णय; जागतिक परिणाम होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:10 AM2022-10-18T10:10:01+5:302022-10-18T10:10:48+5:30
एप्रिल-जून या कालावधीत जवळपास झीरो ग्रोथनंतर तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी ३.३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बीजिंग - आर्थिक मंदीच्या भीतीने, चीन(China) यंदा उशिराने त्यांचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आकडेवारी जाहीर करेल. याशिवाय अर्थव्यवस्थेशी संबंधित इतर मानकांचे आकडेही विलंबाने येतील. आर्थिक डेटा जाहीर करण्याची तारीख काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे असं चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने सांगितले. मात्र यामागचे कारण काय, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते पंचवार्षिक परिषदेसाठी एकत्र येत असताना अशावेळी चीनने जीडीपीची आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिषदेदरम्यान शी जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड होणार आहे. चीन आज म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी जीडीपीचे आकडे जाहीर करणार होता. परंतु १७ ऑक्टोबर रोजी चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने सांगितले की, १८ ऑक्टोबर रोजी आकडेवारी जाहीर केली जाणार नाही. सप्टेंबरच्या तिमाहीत चीनची जीडीपी वाढ कमी राहण्याची अपेक्षा आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरीही असू शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले. कोविडचा सामना करण्यासाठी चीनने त्यांच्या अनेक आर्थिक शहरांमध्ये कठोर लॉकडाऊन लागू केले होते. तसेच, रिअल इस्टेट बाजारातील संकटाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला होता.
चांगले लक्षण नाही
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनचा तिसरा तिमाही जीडीपी डेटा आणि इतर आर्थिक मानके मंगळवारी सत्ताधारी पक्षाच्या कॉन्फरन्स 'काँग्रेस' दरम्यान जाहीर होणार होते. चीनमधील स्टँडर्ड बँक ग्रुप लिमिटेडचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ जेरेमी स्टीव्हन्स म्हणाले की, डेटा रिलीझ पुढे ढकलणे चांगले लक्षण नाही. कारण जगभरातील गुंतवणूकदार चीनचे तिमाही आकडे बारकाईने पाहतात. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या मीडिया कार्यालयात एका फोनला उत्तर देताना कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनामुळे आकडेवारी जाहीर केली जात नाही. परिषदेच्या कामकाजाची व्यवस्था आणि समायोजनामुळे त्यात बदल करण्यात आला आहे असं सांगण्यात आले.
एप्रिल-जून या कालावधीत जवळपास झीरो ग्रोथनंतर तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी ३.३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तथापि, हा विकास दर चीनसाठी अजूनही कमी असेल. हे आकडे चीनच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव दर्शवतात. या महामारीचा सामना करण्यासाठी चीनने कडक निर्बंध लादले होते. तसेच, ही आकडेवारी अलीकडील इतिहासातील सर्वात मोठी मालमत्ता मंदी आहे असं ब्लूमबर्गच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
चीननं ठेवलंय लक्ष्य
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनने या वर्षी जीडीपी वाढीचे लक्ष्य ५.५ टक्के ठेवले आहे. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चीनला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे अनेक आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.