'ड्रॅगन'चा जळफळाट; 'ते' ३० हजार नकाशे चीनने नष्ट केले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:07 PM2019-03-26T17:07:34+5:302019-03-26T17:41:37+5:30
अरुणाचल प्रदेश भारताचा अभिन्न हिस्सा आहे. मात्र, चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आला असून तेथे भारतीय नेत्यांना जाण्यासही विरोध करत असतो.
बीजिंग : एकीकडे इंटनेटसह सरकारी कार्यक्रमांमध्ये भारताचा आक्षेपार्ह नकाशा झळकत असताना चीननेअरुणाचल प्रदेश आणि तैवान त्यांचे क्षेत्र नाही असे दर्शविणारे तब्बल 30 हजार नकाशे नष्ट केले आहेत. महत्वाचे म्हणजे हे नकाशा एका अज्ञात देशाला पाठविण्यासाठी छापण्यात आले होते.
अरुणाचल प्रदेशभारताचा अभिन्न हिस्सा आहे. मात्र, चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आला असून तेथे भारतीय नेत्यांसह सैन्यालाही जाण्यास विरोध करत असतो. दोन्ही देशांदरम्यान 3488 किमीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. यावरूनही चीन वाद घालत असून भारतासोबत आतापर्यंत 21 चर्चा झाल्या आहेत. चीन पासून वेगळा असलेला देश तैवानवरही आपला हक्क सांगत आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधील वृत्तानुसार चीनच्या सीमा शुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय नकाशा दर्शविणारे असे 30 हजार नकाशे नष्ट केले आहेत. चीनमध्ये या नकाशांची छपाई करण्यात आली होती. मंगळवारी हे वृत्त छापून आले आहे. हे नकाशे कोणत्यातरी देशाला पाठविण्यात येणार होते. मात्र, या देशाचे नाव समजलेले नाही. चीनच्या किंग्डाओमध्ये सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी हो नकाशे नष्ट केले. या नकाशांमध्ये तैवानला चीनपासून वेगळा देश दर्शविण्यात आले होते आणि चीन-भारत सीमेचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप होता.
चीनच्या या कृत्याचे इंटरनॅशनल लॉ ऑफ चायना फॉरेन अफेयर्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लियु वेंगजोंग यांनी समर्थन केले आहे. चीनने यासंबंधी उचललेले पाऊल योग्य आहे. कारण कोणत्याही देशाला त्याचे सार्वभौमत्व आणि श्रेत्रीय अखंडता ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तैवान आणि दक्षिण तिबेट हे भाग चीनचेच आहेत जे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार चीनचे अभिन्न भाग आहेत.