CPEC मधील प्रकल्पांसाठी चीनकडून निधीच नाही; पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:52 AM2021-02-16T10:52:58+5:302021-02-16T10:55:22+5:30
China Pakistan Economic Corridor : प्रकल्पांसाठी चीनकडून निधी मिळाला नसल्याचा पाकिस्तानचा दावा
चीननं CPEC या प्रकल्पाच्या निमित्तानं पाकिस्तानात पाय पसरण्यास सुरूवात केली होती. परंतु आता पाकिस्तानला स्वत:ची फसवणूक होत असल्याचं वाटू लागलं आहे. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC) अंतर्गत कोणत्याही पायाभूत सुविधेच्या प्रकल्पासाठी चीनकडून निधी मिळाला नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. सीईसी प्रकल्पांवर सीनेटच्या एका विशेष समितीनं या माहितीचा दावा केला आहे.
‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या नियोजन मंत्रालयाचे परिवहन नियोजन प्रमुख, सिनेटर सिकंदर मंदरू यांनी CPEC अंतर्गत निधी मिळाला नसल्याचं समितीच्या बैठकीत सांगितलं. तसंत यामुळे खुजदार-बसीमा प्रकल्पासह काही प्रकल्प फेडरल आर्थिक निधीमधून बाहेर काढण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. CPEC वर केवळ कागदी कार्यवागी करण्यात आली होती अशी महिती यावेळी समितीचे सदस्य सीनेटक कबीर अहमद शाही यांनी सांगितलं. "एक चौकीदार आणि एक तंबू लावला आणि अशा प्रकारे या योजनेची सुरूवात झाली. न्यू ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूंना एक पडकी इमारत आहे. या व्यतिरिक्त ग्वादर स्मार्ट पोर्ट सिटी मास्टर प्लॅन अंतर्गत कोणतेही प्रकल्प सुरू करण्यात आलेले नाहीत," असंही त्यांनी नमूद केलं.
२०१५ मध्ये गुंतवणूकीची घोषणा
२०१५ मध्ये चीननं पाकिस्तानमध्ये CPEC अंतर्गत ४६ अब्ज डॉलर्सच्या आर्थिक प्रकल्पांची घोषणा केली होती. अमेरिका आणि भारताचा प्रतिकार करण्यासाठी पाकिस्तान तसंच मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचं चीनचं उद्दिष्ट्य होतं. CPEC पाकिस्तानच्या दक्षिण ग्वादर बंदराला (६२६ किलोमीट, कराचीपासून ३८९ मैल पश्चिम) अरबी समुद्रात चीनच्या पश्चिम शिनजियांग क्षेत्राला जोडत असेल. यामध्ये चीन आणि मध्य पूर्व क्षेत्र यांच्या उत्तम संपर्क बनवण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि तेल पाईपलाईन लिंक तयार करण्याची योजनाही सामील आहे.