चीनने आर्थिक वाढीचा दर घटवून केला ७ टक्के
By admin | Published: March 5, 2015 10:59 PM2015-03-05T22:59:06+5:302015-03-05T22:59:06+5:30
निर्यातीत झालेल्या घटीमुळे आर्थिक नरमीला तोंड देत असलेल्या चीनने गुरुवारी आर्थिक वृद्धीचा दर या वर्षासाठी कमी करून सात टक्के केला आहे.
बीजिंग : निर्यातीत झालेल्या घटीमुळे आर्थिक नरमीला तोंड देत असलेल्या चीनने गुरुवारी आर्थिक वृद्धीचा दर या वर्षासाठी कमी करून सात टक्के केला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या वृद्धीचा दर गेल्या वर्षी ७.४ टक्के होता. हा दर गेल्या २४ वर्षांतील सगळ्यात कमी ठरला.
चीनची संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या १० दिवसांच्या वार्षिक अधिवेशनात पंतप्रधान ली क्विंग यांनी सरकारच्या कामकाजाची माहिती सादर केली. त्यानुसार चीनने २०१५ मध्ये वार्षिक सात टक्के वृद्धीचा दर ठरवला आहे. २०१४ मध्ये हा दर ७.५ टक्के होता. २०१४ मध्ये गाठलेल्या ७.४ टक्के वृद्धीच्या दरापेक्षा चालू वर्षातील दर कमी असून १९९० पासून आतापर्यंतचा तो सगळ्यात कमी आहे.
१९७८ आणि २०१३ दरम्यान गेल्या ३५ वर्षांत चीनचा वार्षिक वृद्धीदर सरासरी दहा टक्के राहिला. जुने चांगले दिवस संपले आणि २०१२ व २०१३ मध्ये वृद्धीदर कमी होऊन ७.७ टक्क्यांवर आला. ली क्विंग म्हणाले की, गेल्या वर्षी चीनसमोरच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अडचणी व प्रश्न गुंतागुंतीचे व आव्हानात्मक होते. जागतिक आर्थिक सुधारणांचा रस्ताही ओबडधोबड होता.