चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 10:09 AM2020-06-24T10:09:05+5:302020-06-24T10:15:12+5:30
भारत आणि चीन सैन्यात लडाखमध्ये झटापट झाल्यानंतर नेपाळ सरकारकडून महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध
काठमांडू: चीनच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानं भारताच्या जमिनीवर दावा सांगणाऱ्या नेपाळला आता वेगळीच भीती सतावू लागली आहे. भारतापासून दूर गेलेल्या नेपाळला आता चीनच्या विस्तारवादाचा फटका बसू लागला आहे. तिबेटमधील रस्ते निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून चीन नेपाळमधील जागा बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. चीन भविष्यात सीमेवर सैन्य चौक्या उभारेल, अशी भीती नेपाळ सरकारनं अहवालातून व्यक्त केली आहे. भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधील गलवानमध्ये हिंसक झटापट झाल्यानंतर नेपाळ सरकारनं अहवाल प्रसिद्ध केला.
नेपाळी कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागानं ११ जागांची यादी तयार केली होती. यातल्या ११ जागांवर चीननं अतिक्रमण केलं आहे. या भागाचं एकूण क्षेत्रफळ ३३ हेक्टर्स इतकं आहे. अधिक भूभाग बळकवण्यासाठी चीनकडून नद्यांचे प्रवाह बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही नेपाळ सरकारनं अहवालात नमूद केलं आहे. हुमला जिल्ह्यातील बगदारे खोला आणि कर्नाली नदीच्या पात्रात बदल करून चीननं १० हेक्टर जमीन बळकावली आहे. तर रासुवा जिल्ह्यातील सहा हेक्टर जागादेखील चीननं ताब्यात घेतली आहे.
चीननं तिबेट स्वायत्त प्रदेशातील (टीएआर) रस्त्यांचं जाळं विस्तारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नेपाळच्या दिशेनं वाहणाऱ्या नद्यांचे प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे नेपाळची जमीन कमी होऊ लागली आहे. चीनकडून तिबेट स्वायत्त प्रदेशातील सुरू असलेली रस्त्यांची कामं अशाच प्रकारे सुरू राहिल्यास नेपाळचा भूभाग आणखी कमी होईल, अशी भीती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
'नदीचे प्रवाह अशाच प्रकारे बदलत राहिले, तर शेकडो हेक्टर जमीन तिबेट स्वायत्त प्रदेशात जाईल. भविष्यात या ठिकाणी चीन सीमा निगराणी चौक्या (बीओपी) उभारेल. तिथे सैन्य तैनात करण्यात येईल', असा धोका नेपाळ सरकारनं अहवालातून व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात भारत आणि चीन सैन्यात गलवानमध्ये हिंसक झटापट झाली. त्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. या झटापटीत चीनचंही मोठं नुकसान झालं. या झटापटीनंतर लगेचच नेपाळ सरकारनं त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलं
नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली
जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार