अ‍ॅप बंद करण्याच्या निर्णयाबाबत चीनने व्यक्त केली गंभीर चिंता; प्ले स्टोअर्सवरून टिकटॉक गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 02:18 AM2020-07-01T02:18:15+5:302020-07-01T02:18:37+5:30

‘भारताने जारी केलेल्या बंदी आदेशामुळे चीन सरकार गंभीर चिंतेत आहे. आम्ही परिस्थितीचे आकलन आणि पडताळणी करीत आहोत

China expresses serious concern over decision to shut down the app; TickTock disappears from app stores | अ‍ॅप बंद करण्याच्या निर्णयाबाबत चीनने व्यक्त केली गंभीर चिंता; प्ले स्टोअर्सवरून टिकटॉक गायब

अ‍ॅप बंद करण्याच्या निर्णयाबाबत चीनने व्यक्त केली गंभीर चिंता; प्ले स्टोअर्सवरून टिकटॉक गायब

Next

बीजिंग : ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर चीनने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या वैध आणि कायदेशीर हक्कांचे पालन करण्याची जबाबदारी भारत सरकारवर आहे, असे चीनने म्हटले आहे.
टिकटॉक, शेअरइट आणि यूसी ब्रॉसर यासह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने काल जाहीर केला. लडाखमधील सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारतीय सार्वभौमत्वाला या अ‍ॅपकडून धोका असल्याचा ठपका भारत सरकारने बंदी आदेशात ठेवला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी यासंदर्भात म्हटले की, ‘भारताने जारी केलेल्या बंदी आदेशामुळे चीन सरकार गंभीर चिंतेत आहे. आम्ही परिस्थितीचे आकलन आणि पडताळणी करीत आहोत. विदेशात काम करणाऱ्या चिनी कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे, स्थानिक कायदे आणि नियम यांचे कसोशीने पालन करावे, असे चीन सरकारकडून नेहमीच सांगण्यात येत असते.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या वैध व कायदेशीर हक्कांची जपणूक करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. चीन आणि भारत यांच्यातील संबंध दोन्ही देशांसाठी लाभदायक आहेत. तथापि, ही बाब ताज्या कार्य पद्धतीतून दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे.’

आदेशाच्या पालनाची प्रक्रिया सुरू : टिकटॉक
टिकटॉकने म्हटले की, भारत सरकारने जारी केलेल्या बंदी आदेशाच्या पालनाची प्रक्रिया सुरू आहे. वास्तविक आम्ही कोणत्याही वापरकर्त्याची माहिती चीनसह कोणत्याही विदेशी सरकारला दिलेली नाही. आपले स्पष्टीकरण सादर करण्यासाठी संबंधित सरकारी हितधारकांना भेटण्यास बोलाविण्यात आले आहे. टिकटॉकने म्हटले की, आम्ही डाटा गोपनीयता आणि सुरक्षात्मक गरजा यांचे पालन करीत राहू. दरम्यान, फोनमधील या अ‍ॅपवर क्लिक केले तरी अ‍ॅप ओपन होत नसल्याचे सांगण्यात आले.

अ‍ॅप स्टोअर्सवरून टिकटॉक गायब
भारत सरकारच्या बंदी आदेशानंतर लोकप्रिय टिकटॉक अ‍ॅप विविध ‘अ‍ॅप स्टोअर्स’वरून काढून टाकण्यात आले आहे. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर या लोकप्रिय अ‍ॅप स्टोअर्सवरून हे अ‍ॅप हटविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी या अ‍ॅप स्टोअर्सवर सर्च देऊन पाहिला असता, ते गायब असल्याचे आढळून आले.

Web Title: China expresses serious concern over decision to shut down the app; TickTock disappears from app stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.