पाकमधील राजदूताची हत्या होण्याची चीनला भीती, तुर्की अतिरेक्यावर संशय; सुरक्षा वाढविण्याची केली विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:51 AM2017-10-23T04:51:37+5:302017-10-23T04:51:51+5:30
पाकिस्तानमध्ये नव्याने नेमलेले राजदूत याओ जिंग यांची एका दहशतवादी संघटनेकडून हत्या केली जाण्याची भीती व्यक्त करत, चीनने या राजदूतासह एकूणच पाकिस्तानमध्ये काम करणाºया चीनी नागरिकांची सुरक्षा वाढविण्याची विनंती पाकिस्तानला केली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नव्याने नेमलेले राजदूत याओ जिंग यांची एका दहशतवादी संघटनेकडून हत्या केली जाण्याची भीती व्यक्त करत, चीनने या राजदूतासह एकूणच पाकिस्तानमध्ये काम करणाºया चीनी नागरिकांची सुरक्षा वाढविण्याची विनंती पाकिस्तानला केली आहे.
गेली तीन वर्षे इस्लामाबादमध्ये चीनचे राजदूत असलेले सुन वेईडाँग मायदेशी परत गेल्यानंतर अफगाणिस्तानमधील राजदूत याओ जिंग यांना चीनने पाकिस्तानमध्ये नेमले व त्यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे संपर्क अधिकारी पिंग यिंग पी यांनी १८ आॅक्टोबर रोजी लिहिलेले पत्र चीनच्या वकिलातीने अलीकडेच पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडे सुपुर्द केले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या पत्रात पी यांनी म्हटले आहे की, राजदूत याओ जिंग यांची हत्या करण्यासाठी ‘इस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ या दहशतवादी संघटनेचा एक अतिरेकी छुपेपणाने पाकिस्तानमध्ये शिरल्याची पक्की खबर मिळाली आहे. त्यामुळे जिंग यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षा व्यवस्तेत वाढ करण्यात यावी. (वृत्तसंस्था)
>चीनचे अधिकारी आधीपासूनच पाकिस्तानसाठी डोकेदुखीचा विषय
चीन हा पाकिस्तानचा घनिष्ट मित्र असला, तरी चीनी अधिकारी आणि नागरिकांची सुरक्षा हा पाकिस्तानच्या दृष्टीने आधीपासूनच चिंतेचा विषय असून, हे काम प्रामुख्याने लष्करावर सोपविण्यात आले आहे. खास करून ‘सीपीईसी’मुळे चीनचा पाकिस्तानमधील वावर व गुंतवणूक पूर्वी कधीही नव्हती एवढी वाढणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सर्व खर्च चीन करणार असून, चीनच्या शिनजियांग या अशांत प्रांतापासून पाकिस्तानच्या ग्वदार बंदरापर्यंत रेल्वे, महामार्ग व पाइपलाइन्सचे जाळे उभे करण्याची योजना आहे.