अखेर चीनने मानले भारताचे सामर्थ्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे केले तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 05:22 PM2024-01-04T17:22:48+5:302024-01-04T17:26:39+5:30
भारत आता जागतिक स्तरावर अधिक आत्मविश्वासाने वावरत असल्याचेही मांडले मत
China Praises India Pm Modi: जागतिक स्तरावर सर्वच देश विविध आव्हानांना तोंड देत आहेत. भारत आणि चीन हे दोन देश आशिया खंडातील बलाढ्य देश मानले जातात. मात्र राजकीय आणि सीमेवरील हालचालींमुळे भारत आणि चीन या दोन देशांमध्ये कायमच तणावाची स्थिती असते. दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख फारसे एकमेकांबद्दल बोलताना दिसत नाहीत. पण सध्या एक वेगळी बाब घडल्याचे दिसत असून चीनने भारताचे कौतुक केल्याची घटना समोर आली आहे.
चीनच्या ग्लोबल टाइम्सने भारताचे भरभरून कौतुक केले आहे. एका लेखात त्यांनी भारताची ताकद ओळखून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसाही केली आहे. भारत आता धोरणात्मकदृष्ट्या अधिक आत्मविश्वासाने भरलेला दिसतो आहे आणि विकासाच्या दिशेने अधिक सक्रिय झाला आहे यावर लेखात भर देण्यात आला आहे. ग्लोबल टाईम्सच्या लेखात भारत आपल्या निर्यातीवर अधिक भर देत असल्याचे लिहिले होते. त्याचे भारत विविध मुद्द्यांमध्ये अधिकाधिक उदयास येत आहे आणि तो अधिक आत्मविश्वासाने वावरत आहे, असे लिहिण्यात आले आहे.
भारताला आता कोणत्याही परिस्थितीत गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त व्हायचे आहे. त्यांना संपूर्ण जगाचा मार्गदर्शक बनायचे आहे, मग तो राजकीय किंवा सांस्कृतिकदृष्ट्या असो, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हळूहळू भारत हा राजकीय स्तरावर महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत नाव नोंदवण्यात एक पाऊल आणखी पुढे गेल्याचे दिसत आहे.