China Flood 2024 : चीनमध्ये पूरस्थिती, सर्वत्र पाणीच पाणी; 24 तासांत कोसळळा वर्षभराएवढा पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 01:35 PM2024-07-18T13:35:59+5:302024-07-18T13:36:17+5:30
china flood 2024 : सर्वात मोठी समस्या मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शहरांमध्ये आहे. अचानक आलेल्या पुरामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
चीनमध्ये अचानक पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. येथे गेल्या केवळ 24 तासांतच वर्षभरात होतो तेवढा पाऊस झाला आहे. यामुळे चीनमधील 31 नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वात मोठी समस्या मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शहरांमध्ये आहे. अचानक आलेल्या पुरामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
नानयांग शहरात दाफेंगयिंगमध्ये एकाच दिवसात 606.7 मिमी (24 इंच) पाऊस -
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नानयांग शहरात दाफेंगयिंगमध्ये एकाच दिवसात 606.7 मिमी (24 इंच) पाऊस नोंदवल्या गेला. वर्षाचा विचार करता या भागात सरासरी 800 मिमी एवढा पाऊस पडतो. तसेच, हेनान प्रांतातील अधिकाऱ्यांनी खराब हवामानामुळे हाय अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने हेनान, शेडोंग आणि अनहुई प्रांतात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी, अडकलेल्यांना बाहेर काढले -
चीनमधील CGTN च्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी हेनान प्रांतातील नानयांगच्या डेंगझोऊ शहरात पाणी धोकादायक पातळीवर पोहोचले होते. वाढत्या पाणीपातळीमुळे अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बचाव पथकाने घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर, बीजिंग अनेक शहरांतील ट्रेन बंद केल्या आहेत. वायव्य प्रांतातील गांसूमधील कांग काउंटीनेही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
चीनने आपले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस डॅमचे दरवाजेही उघडले -
आशिया खंडात पावसाचा सर्वाधिक फटका चीनवर बसला आहे. चीनमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. चीनमधील 31 नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अनेक धरणंही भरली आहे. एवढेच नाही तर, चीनने आपले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस डॅमचे दरवाजेही उघडले आहेत. याशिवाय, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातही जबरदस्त पाउस झाला आहे.