बुडत्या पाकला चीनचा आधार, आर्थिक मदतीची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 07:00 PM2018-11-07T19:00:49+5:302018-11-07T19:01:04+5:30
आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चीननं मदतीचा हात दिला आहे.
इस्लामाबाद- आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चीननं मदतीचा हात दिला आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. परंतु या मदतीसंदर्भात चीननं सार्वजनिकरीत्या वाच्यता केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिक पॅकेज मागण्याच्या निमित्तानं चीनचा दौराही केला होता. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी सांगितलं की, चीननं पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
उमर म्हणाले, पाकिस्तानला 12 अब्ज डॉलरच्या मदतीची गरज आहे. त्यातील 6 अब्ज डॉलर आम्हाला सौदी अरेबिया देणार आहे. तर उर्वरित रक्कम चीननं कर्जाच्या स्वरूपात देण्यास सहमती दर्शवली आहे. चीनच्या या मदतीमुळे पाकिस्तानमधलं आर्थिक संकट काही प्रमाणात कमी होईल. इम्रान खान यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही चीनचा दौरा केला होता. पाकिस्तानमधलं आर्थिक संकट आता संपण्याच्या मार्गावर आहे, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत असलं तरी चीननं यावर सार्वजनिकरीत्या कोणतंही भाष्य केलेलं नाही. पाकिस्तान हा चीनचा नेहमीच मित्र राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. आम्ही आमच्यापरीनं पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करू, येत्या काळातही पाकिस्तानच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.