China Pakistan: भारताला घेरण्याची तयारी? चीनने पाकला दिले अधिक क्षमतेचे ड्रोन; दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 09:12 AM2021-10-07T09:12:28+5:302021-10-07T09:13:08+5:30
China Pakistan: जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून काही ना काही कुरापती सुरूच आहेत.
इस्लामाबाद:जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून काही ना काही कुरापती सुरूच आहेत. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत, प्रोत्साहन देत असून, मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यातच आता चीननेपाकिस्तानला मदत सुरूच ठेवली असून, चीनकडून पाकिस्तानला अत्याधुनिक तसेच अधिक पेलोड क्षमता असलेले ड्रोन (payload capacity drones) पुरवले असल्याचे समोर आले आहे. इतकचे नव्हे तर आता चिनी सैन्य दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचे सांगितले जात आहे.
लडाख सीमेवर झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चीन आणि पाकिस्तान यांनी एकत्रितपणे भारताविरोधात मोर्चा उघडल्याचे सांगितले जात आहे. यातच आता एका कंसाइनमेंटच्या माध्यमातून चीन पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि अन्य महत्त्वाचे युद्ध साहित्य पाठवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मोठ्या क्षमतेच्या ड्रोनचा पुरवठा
आताच्या घडीला पाकिस्तानकडे पाच ते सात किलो पेलोड क्षमतेचे ड्रोन उपलब्ध आहेत. हे ड्रोन १४ ते १५ किमीचे अंतर सहज पार करू शकतात. तसेच हे ड्रोन ६ ते ८ तास कार्यरत राहू शकतात. आता मात्र चीनने पाकिस्तानला १५ ते २० किलो पेलोड क्षमतेचे ड्रोन पुरवले असून, हे ड्रोन २० ते २५ किमीचे अंतर पार करू शकतात. तसेच २० तास कार्यरत राहू शकतात. यामुळे पाकिस्तानची ताकद वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दीड वर्षांत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये ५० वेळा ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पैकी ३० ड्रोन भारतीय सैन्याने पाडले.
दरम्यान, ड्रोन, शस्त्रास्त्र पुरवठा करण्यासोबतच चिनी सैन्य आता पाकिस्तानातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत असल्याची माहितीही मिळाली आहे. यामुळे आता भारताला दोन्ही बाजूने घेरण्याची तयारी सुरू केली आहे का, अशी शक्यता वर्तवली जात असून, भारताची डोकेदुखी वाढू शकते, असे सांगितले जात आहे.