"इम्रान खान सरकारने 60 अब्ज डॉलरच्या CPEC प्रकल्पाची बदनामी केली", पाक मंत्र्याचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:16 AM2023-07-10T11:16:28+5:302023-07-10T11:16:57+5:30
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोणत्याही 'नवीन प्रयोगांबद्दल' चीनने तत्कालीन पाकिस्तान सरकारला इशारा दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या म्हणजेच मागील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) सरकारने 60 अब्ज डॉलर्सच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसन इक्बाल यांनी केला आहे. तसेच, 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोणत्याही 'नवीन प्रयोगांबद्दल' चीनने तत्कालीन पाकिस्तान सरकारला इशारा दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.
शनिवारी रात्री एका खासगी वृत्तवाहिनी 'जिओ टीव्ही'च्या कार्यक्रमात नियोजन मंत्र्यांनी हा दावा केला. इक्बाल यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर सीपीईसी प्रकल्पाची बदनामी केल्याचा आरोप केला आणि सांगितले की या प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेले आणि इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांना पाश्चात्य माध्यमांनी अतिशयोक्तीपूर्ण केले. ते म्हणाले, चीनच्या सरकारी मालकीच्या कंपनीने ज्या मंत्र्यासोबत काम केले होते त्यांच्या विरोधात निंदनीय वक्तव्य करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
जिओ टीव्हीने पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) नेत्याचा हवाला देत म्हटले आहे की, "सीपीईसीला हानी पोहोचेल म्हणून कोणत्याही नवीन प्रयोगापासून परावृत्त व्हावे यासाठी चीनने कुटनीतीने तत्कालीन सरकारला (एक मेसेज) देण्याचा प्रयत्न केला होता." पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारने चीनला आश्वासन दिले होते की, येथे कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी ते सीपीईसीच्या पायाभूत सुविधा आणि 'कनेक्टिव्हिटी' प्रकल्पात अडथळा आणणार नाही.
याचबरोबर, नियोजन मंत्री अहसन इक्बाल म्हणाले की, चीनने सरकारला निवडणुकीत हस्तक्षेप करू नये, असे सांगितले होते. कारण 'परिवर्तनाचा कोणताही प्रयोग पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरणार नाही आणि सीपीईसी प्रकल्प नष्ट करेल.' याशिवाय, एका प्रश्नाला उत्तर देताना अहसन इक्बाल यांनी देशाच्या प्रगती आणि विकासासाठी धोरणांमधील सातत्य ठेवण्याच्या आवश्यकेवर भर दिला.