India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:26 PM2020-06-18T13:26:48+5:302020-06-18T13:33:50+5:30
दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न देखील चीनकडून केला जात आहे.
लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील तयार झाले आहेत. मात्र दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न देखील चीनकडून केला जात आहे.
चीन सरकारचे वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'मधून पुन्हा एकदा भारताला धमकी देण्यात आली आहे. ग्लोबल टाइम्समध्ये भारतासोबत युद्ध संघर्ष करण्यासाठी चीन पूर्णपणे तयार असल्याचे चीनमधील काही विश्लेषकांनी सांगितले आहे. त्यामुळे भारताने आपल्या सैन्याला आवर घालावा, नाहीतर भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील चीनने दिला आहे.
शांघाई अकादमी ऑफ सोशल सायन्सचे के हू झियोंग यांनी भारताचे पाकिस्तान आणि नेपाळसोबतही वाद सुरू असल्याकडे लक्ष वेधले आहे. भारताचे सध्या चीनसोबत पाकिस्तान आणि नेपाळसोबतही वाद सुरु आहे. पाकिस्तान चीनचा विश्वासू सहकारी आहे. तसेच नेपाळसोबतही चीनचे चांगले संबंध आहे. त्यामुळे संघर्ष आणखी वाढल्यास भारताला आमच्यासह पाकिस्तान आणि नेपाळच्या सैन्यासोबत लढावं लागेल, अशी धमकी देखील चीनकडून देण्यात आली आहे.
चीनने आता कुरापती केल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तर भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आपले सैन्य तैनात करण्याची शक्यता भारतीय लष्कराला आहे. भारत एलएसीवरील फायरिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षानंतर दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. पण भारतीय सीमेवर संघर्ष वाढू नये, अशी चीनची भूमिका आहे. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री रात्री दोन्ही देशांमधील हिंसक चकमकीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४३ सैनिकांचा खात्मा केला. तर चीनला सीमेवर आणखी संघर्ष नको आहे. दोन्ही देशांनी या परिस्थितीतून संवाद आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी चीनची भूमिका आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.