चीनने तोडले अकलेचे तारे ! म्हणे दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानने दिले खूप मोठे 'बलिदान'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 05:19 PM2017-08-22T17:19:31+5:302017-08-22T17:29:20+5:30
दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्यावरुन अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर चीनने पाकिस्तानची पाठराखण केली आहे.
बिजींग, दि. 22 - दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्यावरुन अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर चीनने पाकिस्तानची पाठराखण केली आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तान आघाडीवर राहून लढाई लढत आहे. पाकिस्तानने या लढाईत मोठे बलिदान दिले असून, त्यांचे योगदानही मोठे आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग म्हणाल्या.
पाकिस्तानात दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रय स्थान असून या मुद्यावर अमेरिका गप्प बसू शकत नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे चालूच ठेवले तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली. त्यानंतर चीनने पाकिस्तानची पाठराखण केली आहे.
अफगाणिस्तानमध्ये ब-याच वर्षांपासून अमेरिकेची लढाई सुरु आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी आणखी सैन्य अफगाणिस्तानात पाठवण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ट्रम्प यांच्या पाकिस्तान संदर्भातल्या वक्तव्यावर बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग म्हणाल्या की, दहशतवादाविरोधात पाकिस्तान आघाडीवर राहून लढाई लढत आहे. पाकिस्तानने या लढाईत मोठे बलिदान दिले असून, त्यांचे योगदानही मोठे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या या दहशतवाद विरोधी लढयाची दखल घेतली पाहिजे असे च्युनयिंग म्हणाल्या.
'पाकिस्तान दहशतवाद्यांचं आश्रयस्थान'
पाकिस्तान नेहमी हिंसा पसरवणा-यांना, दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे. अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या 20 संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहेत. पाकिस्तान जर अफगाणिस्तानातील आमच्या कारवाईला सहकार्य करणार असेल तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी असे बरेच काही असेल, मात्र पाकिस्तान जर दहशवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात नव्या धोरणांची घोषणादेखील केली.
यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रय स्थान असल्याची टीका केली होती. पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील. अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश नव्या दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रय स्थाने ठरु शकतात असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते.