पाकिस्तानात रेल्वेचं जाळे उभारण्यातच चीन करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 03:53 PM2018-04-13T15:53:35+5:302018-04-13T15:53:35+5:30
कराची ते पेशावर असे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंतचे रेल्वेमार्गांचे जाळे चीनच्या मदतीने तयार केले जात आहे.
कराची- पाकिस्तानातील रेल्वेचे जाळे उभे करण्यासाठी चीन मदत करणार आहे. कराची ते पेशावर असे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंतचे रेल्वेमार्गांचे जाळे चीनच्या मदतीने तयार केले जात आहे. यासाठी चीनने 8 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचे निश्चित केले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी. जिनपिंग यांच्ये बेल्ट अँड रोड या प्रकल्पाचा ही रेल्वे एक भागच असेल. हे सर्व काम यावर्षीच सुरु होणार असल्याचे पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या दशकामध्ये अत्यंत दुर्लक्ष आणि भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानातील लोहमार्गाची स्थिती अत्यंत वाईट झालेली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तान रेल्वेचा महसूल 40.1 अब्ज पाकिस्तानी रुपये (362 दशलक्ष डॉलर्स) वरती गेला आहे. येत्या काळामध्ये यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे पाकिस्तान रेल्वेच्या सचिव परवीन आगा यांनी सांगितले.
पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकावरील मोठ्या शहरात म्हणजे लाहोरमध्ये मेट्रोचे बांधकाम करण्यासाठी 1.6 अब्ज डॉलर्स चीनच्या बँकांनी दिले आहेत. पाकिस्तानने गेल्या वर्षी 75 लोकोमोटोव्हीजची खरेदी केली असून त्यांची किंमत 413.5 दशलक्ष डॉलर्स इतकी असून ही खरेदी जनरल इलेक्ट्रीक कंपनीकडून केली आहे.