तैवानला मिळणाऱ्या समर्थनामुळे चीन भडकला, आवाज उठवणाऱ्यांना देणार 'ही' शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 09:52 AM2021-11-06T09:52:29+5:302021-11-06T09:54:41+5:30
China : चीनने तैवानच्या स्वातंत्र्याच्या समर्थकांना उघडपणे धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बिजिंग : तैवानच्या (Taiwan) समर्थनार्थ उठलेला आवाज चीन (China) नेहमीच दाबत आला आहे. आता चीनने आणखी एक भयानक पाऊल उचलले आहे. चीनचे कम्युनिस्ट सरकार तैवानच्या स्वातंत्र्याबाबत समर्थन करण्याऱ्या लोकांना आयुष्यभर गुन्हेगार ठरणार आहे. चीनच्या तैवान अफेयर्सच्या कार्यालयाचे प्रवक्ते जू फेंग्लियन यांनी ही माहिती दिली. दरम्यान, चीनने तैवानच्या स्वातंत्र्याच्या समर्थकांना उघडपणे धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चीन आणि तैवान यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रात सुमारे 200 लढाऊ विमाने पाठवली होती. चीनने तैवानवर आपला दावा सातत्याने केला आहे आणि ते चीनमध्ये विलीन करण्यासाठी लष्करी कारवाईसाठीही उत्सुक असल्याचे दिसून येते. या मुद्द्यावर अमेरिकाही चीनच्या विरोधात आहे. मात्र, असे असूनही, चीन आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही.
पहिल्यांदाच अशी यादी जारी
चीनने एक यादी काढली आहे. यामध्ये तैवानचे पंतप्रधान सु त्सेंग चांग, संसदेचे अध्यक्ष यू सी-कुन आणि परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांना "हट्टी तैवानचे स्वातंत्र्य समर्थक" म्हणून नावे जाहीर केली आहेत. अशी यादी प्रथमच सार्वजनिक करण्यात आली आहे. यादीत नाव असलेल्यांना चीन आणि हाँगकाँग आणि मकाऊ सारख्या विशेष प्रशासकीय प्रदेशात प्रवेश दिला जाणार नाही, असे चीनने म्हटले आहे.
'अशा लोकांना जनता नाकारेल'
फेंग्लियनने म्हटले आहे की, काळ्या यादीत टाकलेल्या लोकांना संस्था किंवा चीनच्या लोकांसोबत सहकार्य करण्याची परवानगी दिली जाणार नाही. चीन या लोकांविरुद्ध 'इतर आवश्यक उपाय' करेल असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर, 'आम्ही तैवानच्या स्वातंत्र्य समर्थकांना स्पष्ट संदेश देऊ इच्छितो की, जे आपल्या पूर्वजांना विसरतात, मातृभूमीशी गद्दारी करतात, देश तोडण्याचे काम करतात, त्यांचा शेवट कधीही चांगला होऊ शकत नाही. त्यांना जनता नाकारेल', असे फेंग्लियन म्हणाले.