तैवानच्या डोक्यावर चीनच्या घिरट्या; लढाऊ विमानांच्या ताफ्याद्वारे लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:05 AM2023-08-11T06:05:13+5:302023-08-11T06:08:15+5:30
चीन तैवान हा आपला प्रदेश असल्याचा दावा करतो व तेथील राजकीय घडामोडींना प्रत्युत्तर म्हणून अनेकदा लढाऊ विमाने पाठवतो.
तैपेई : चीनने तैवानवरील लष्करी दबाव कायम ठेवण्यासाठी नौदलाची जहाजे तसेच लढाऊ विमानांचा मोठा ताफा या बेटाकडे पाठवला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.
चीन तैवान हा आपला प्रदेश असल्याचा दावा करतो व तेथील राजकीय घडामोडींना प्रत्युत्तर म्हणून अनेकदा लढाऊ विमाने पाठवतो. चीनने गेल्या वर्षभरात अशा प्रकारे अनेकवेळा नौदलाची जहाजे व ड्रोन तैवानकडे पाठवले आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ‘चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने बुधवारी सकाळी ६ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेदरम्यान ३३ लढाऊ विमाने आणि नौदलाची सहा जहाजे पाठवली. यामुळे तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने यापूर्वीच तैवानच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.(वृत्तसंस्था)
तैवानकडूनही तयारी
जे-१० व जे-१६ सारख्या लढाऊ विमानांनी तैवानच्या नैऋत्य भागात उड्डाण केले.’ चीनचा वाढता लष्करी दबाव लक्षात घेऊन तैवान आपली सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी शस्त्रे आणि लढाऊ विमाने खरेदी करत आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने तैवानसाठी ३४५ दशलक्ष डॉलरचे लष्करी पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये तैवानला लष्करी साहित्याच्या पुरवठ्याचा समावेश आहे.
‘युद्धासाठी तयार राहा’
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी लष्कराला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. उन यांनी युद्धाच्या वाढत्या शक्यता लक्षात घेऊन लष्करी कवायती वाढवण्याच्या सूचना दिल्या.