जिनपिंग यांच्यासाठी चीन बनवतोय जगातला सर्वात मोठा आण्विक बंकर, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:28 IST2025-02-01T16:25:39+5:302025-02-01T16:28:11+5:30
China News: चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशामध्ये आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केलेली आहे. तसेच जगातील महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या चीनचे त्याच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देशांशी खटके उडत असतात.

जिनपिंग यांच्यासाठी चीन बनवतोय जगातला सर्वात मोठा आण्विक बंकर, कारण काय?
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशामध्ये आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केलेली आहे. तसेच जगातील महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या चीनचे त्याच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देशांशी खटके उडत असतात. अशा परिस्थितीत आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी चीनने मोठी रणनीती आखली आहे. चीन आपली राजधानी बीजिंगजवळ जगातील सर्वात मोठं लष्करी कमांड सेंटर बनवण्याची तयारी करत आहे. हे सेंटर अणुयुद्धाच्या परिस्थितीत देशातील नेत्यांचं संरक्षण करण्यास सक्षम असेल. हे कमांड सेंटर राजधानी बीजिंगपासून सुमारे ३२ किमी दक्षिण-पश्चिम भागात आहे. तब्बल १५०० एकर जागेमध्ये उभारण्यात येत असलेलं हे कमांड सेंटर अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनपेक्षा १० पटीने अधिक मोठं आहे.
संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या लष्करी कमांड सेंटरमध्ये भक्कम सैनिकी बंकर उभारले जाऊ शकतात, हे बंकर अणुयुद्धाच्या परिस्थितीत राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांचं संरक्षण करण्यास सक्षम असतील. चीनकडून उभारण्यात येत असलेल्या या कमांड सेंटरच्या बांधकाम स्थळाचे सॅटेलाईट फोटो ब्रिटिश वर्तमानपत्र फायनान्शियल टाइम्सला प्राप्त झाले आहेत. यामध्ये या ठिकाणी दिवस-रात्र काम सुरू असल्याचं दिसत आहे.
या लष्करी तळाला बीजिंग मिलिट्री सिटी, असं नाव दिलं जाऊ शकतं. चीनमध्ये सध्या आर्थिक संकट असलं तरी या तळावरील निर्मिती कार्य वेगाने सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते हा लष्करी तळ पश्चिमेतील पर्वतीय प्रदेशात असलेल्या सध्याच्या सुरक्षित कमांड सेंटरचं स्थान घेऊ शकतो. चीनमधील सध्याच्या कमांड सेंटरची निर्मिती ही शितयुद्धाच्या काळात झाली होती.
सध्या चीनकडून बांधकाम करण्यात येत असलेला लष्करी तळ चीनला अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्ब आणि आण्विक संकटांपासून संरक्षण पुरवू शकेल. या लष्करी तळामध्ये खोलवर पसरलेले भूमिगत बोगदे आणि भक्कम भिंती बांधल्या जात आहेत. भविष्यात चीनसमोर असलेला आण्विक युद्धाचा धोका विचारात घेऊन हे कमांड सेंटर उभे केले जात आहे.