चीन, जपानने सागरातून केले ‘ज्वालाग्राही बर्फा’चे उत्खनन

By admin | Published: May 23, 2017 07:02 AM2017-05-23T07:02:43+5:302017-05-23T07:02:43+5:30

चीन आणि जपानने खोल सागराच्या तळातून ‘ज्वालाग्राही बर्फा’चे (कम्बस्टिबल आइस) यशस्वीपणे उत्खनन केल्याने

China, Japan excavate 'flammable ice' from the sea | चीन, जपानने सागरातून केले ‘ज्वालाग्राही बर्फा’चे उत्खनन

चीन, जपानने सागरातून केले ‘ज्वालाग्राही बर्फा’चे उत्खनन

Next

बीजिंग : चीन आणि जपानने खोल सागराच्या तळातून ‘ज्वालाग्राही बर्फा’चे (कम्बस्टिबल आइस) यशस्वीपणे उत्खनन केल्याने पृथ्वीतलावर गोठलेल्या स्वरूपात प्रचंड प्रमाणावर उपलब्ध असलेल्या या नव्या जीवाश्म इंधनाचे (फॉसिल फ्यूल) व्यापारी उत्पादन करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले गेले आहे.
सुमारे दोन दशकांच्या अथक संशोधन व प्रयोगांनंतर दक्षिण चीन समुद्रातील शेनहू भागात १,२६६ मीटर खोल सागरतळातून ‘ज्वालाग्राही बर्फ’ विलग करून बाहेर काढण्यात वैज्ञानिकांना यश आल्याचे वृत्त शिनहुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले.
गेल्या आठवडाभरात या ठिकाणाहून १.२० लाख घनफूट ‘ज्वालाग्राही बर्फ’ बाहेर काढण्यात आले. चीनचे भूसंपदामंत्री जिआंग दामिंग यांनी याबद्दल वैज्ञानिकांचे व तंत्रज्ञांचे अभिनंदन करताना ही घटना जगात नव्या इंधन क्रांतीचा श्रीगणेशा करणारी ठरू असू शकेल, असे नमूद केले.
दोन आठवड्यांपूर्वी जपाननेही शिमा द्विपकल्पाच्या किनाऱ्यावरील समुद्रातून अशाच प्रकारे ‘ज्वालाग्राही बर्फा’चे यशस्वी उत्खनन केल्याचे जाहीर केले होते. अमेरिका आणि भरताचेही असे प्रयोग सुरू आहेत; पण त्यांना यश आलेले नाही.
जपान व चीनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे उत्खनन यशस्वी झाले असले तरी मोठ्या प्रमाणावर व्यापारी उत्पादन किमान २०३० पर्यंत तरी शक्य होईल, असे तज्ज्ञांना वाटत नाही. याची प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे यासाठी येणारा मोठा खर्च. सध्याच्या तंत्रज्ञानानुसार खोल सागराच्या तळाशी ‘ज्वालाग्राही बर्फा’चे साठे विलग करून पृष्ठभागावर आणण्यासाठी त्यात प्रचंड दाबाने पाणी किंवा कार्बन डायआॅक्साईड पंपाने भरला जातो. हे खूप खर्चिक आहे. दुसरे कारण आहे सुरक्षेचे. (वृत्तसंस्था)


‘ज्वालाग्राही बर्फ’ म्हणजे बव्हंशी गोठलेला मिथेन वायू असतो. काढताना व वाहतूक करताना त्याची हवेत गळती झाली तर ती हवामान बदलास कारणीभूत ठेरणाऱ्या अन्य वायूंहून दसपटीने अधिक हानीकारक ठरू शकते. या धोक्याचे शंभर टक्के निर्मूलन करून या इंधनाचे मोठ्या प्रमाणावर निर्धोक उत्खनन करण्याचे तंत्र सध्या तरी उपलब्ध नाही.

‘ज्वालाग्राही बर्फा’ला वैज्ञानिक परिभाषेत ‘मिथेन हायड्रेट’ असे म्हटले जाते. ते पाण्याचे आणि संपृक्त नैसर्गिक वायूचे गोठलेले मिश्रण असते. त्यात मिथेनचे प्रमाण ९९.५ टक्के असते. ते गोठलेल्या स्थितीतच पेट घेते. ‘मिथेन हायड्रेट’चे भूगर्भातील अस्तित्व सन १९६०च्या दशकापासून वैज्ञानिकांना माहीत आहे. ते सागराच्या तळाशी आणि आर्क्टिक व अंटार्क्टिक प्रदेशातील हिमस्तरांच्या खाली आढळते.

Web Title: China, Japan excavate 'flammable ice' from the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.