अमेरिकेच्या डझनभर हेरांना चीनने मारले
By admin | Published: May 22, 2017 03:30 AM2017-05-22T03:30:09+5:302017-05-22T03:30:09+5:30
चीनने सन २०१० ते २०१२ या दोन वर्षांत ‘सीआयए’च्या डझनभर खबऱ्यांना ठार करून आणि आणखी सहा ते आठ जणांना अटक करून अमेरिकेचे चीनमधील हेरगिरीचे जाळे
वॉशिंग्टन : चीनने सन २०१० ते २०१२ या दोन वर्षांत ‘सीआयए’च्या डझनभर खबऱ्यांना ठार करून आणि आणखी सहा ते आठ जणांना अटक करून अमेरिकेचे चीनमधील हेरगिरीचे जाळे पार खिळखिळे करून टाकले असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. सीआयए ही अमेरिकेची गुप्तहेर संघटना आहे. याच संघटनेच्या १० आजी आणि माजी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गुप्तचर माहितीशी संबंधित हे प्रकरण गेल्या काही दशकांतील सर्वात गंभीर प्रकरण आहे.
अमेरिकी गुप्तचर आणि इतर यंत्रणांनी ही हानी भरून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत; मात्र याबाबत त्यांच्यात मतभेद असल्याचे दिसते. सीआयएमध्येच कोणीतरी घरभेदी असल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काहींच्या मते, सीआयए आपल्या विदेशी सूत्रांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेली प्रणालीच चिनी लोकांनी हॅक केली आहे. हा वादविवाद अजूनही थांबलेला नाही.
वृत्तपत्राला काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या सीआयएने वृत्तसंस्थेलाही प्रतिक्रिया दिली नाही. (वृत्तसंस्था)