चीन पाकिस्तानात लष्करी तळ उभारण्याची शक्यता - पेंटागन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 12:43 AM2017-06-08T00:43:24+5:302017-06-08T00:43:24+5:30
मैत्री आणि समान हितसंबंध असलेल्या इतर देशांत अतिरिक्त लष्करी तळे उभारण्याची शक्यता असल्याचे पेंटागनच्या नव्या अहवालात म्हटले आहे
वॉशिंग्टन : चीन पाकिस्तान आणि प्रदीर्घ काळापासून मैत्री आणि समान हितसंबंध असलेल्या इतर देशांत अतिरिक्त लष्करी तळे उभारण्याची शक्यता असल्याचे पेंटागनच्या नव्या अहवालात म्हटले आहे. पेंटागन हे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय आहे.
पेंटागनने चीनच्या लष्करी सज्जतेविषयीचा वार्षिक अहवाल सादर केला. जगभरातील मैत्रीपूर्ण देशांच्या बंदरांवर लष्करी तळांचा विस्तार करण्याची चीनची योजना असून, जिबुतीच्या व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणी तळ उभारून चीनने या योजनेची मुहूर्तमेढ रोवली आहे.
हिंद महासागर, भूमध्यसागर आणि अटलांटिक महासागर यासारख्या दूरच्या सागरी भागातील तैनातीची शाश्वतता आणि नियमनासाठी आवश्यक साहित्याची पूर्तता निश्चित करण्यासाठी चीन परदेशी बंदरांपर्यंत आपली पोहोच वाढवीत आहे. चीन दीर्घ काळापासून मैत्री आणि हितसंबंध असलेल्या देशांमध्ये (जसे की पाकिस्तान) लष्करी तळे स्थापन करू इच्छितो, असे पेंटागनने म्हटले आहे.
इच्छा नसूनही पाठिंबा द्यावा लागतो
अतिरिक्त तळ स्थापन करण्याचा चीनचा प्रयत्न काही देशांना रुचणार नाही; परंतु इच्छा नसूनही आपल्या बंदरावरील चिनी सैनिकांच्या उपस्थितीला पाठिंबा द्यावा लागू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. चीन बलुचिस्तानात ग्वादर बंदराचा विकास करीत असून, तेथे लष्करी उपस्थिती ठेवण्यास चीन हे करीत आहे.