सर्वकाही बनवणारा चीन एका चिपसाठी अडला, झाले हजारो कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 04:06 PM2021-11-06T16:06:27+5:302021-11-06T16:07:10+5:30
China News: चीनमध्ये आता चिपची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बीजिंग - कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यस्थेला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता ऑटोमोबाईल इंडस्ट्री सेमीकंडक्टच्या टंचाईचा सामना करत आहे. चीनमध्ये आता चिपची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जगातील सर्व मोठ्या ऑटो कंपन्या सेमी-कंडक्टरच्या टंचाईचा सामान करत आहेत. भारतामध्येही ऑक्टोबर २०२१ मध्ये सणावारांचे दिवस अजूनही वाहन विक्रीमध्ये मोठी घट झाली होती. आता चीनचा आकडाही समोर आला आहे. चीनमध्येही ऑक्टोबर महिन्यात वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.मोठ्या परदेशी कार कंपन्यांसाठी चीन एक मोठी बाजारपेठ आहे. विशेषकरून होंडा, निसान आणि टोयोटा कंपन्या चीनमध्ये दरवर्षी लाखो कारची विक्री करतात. मात्र ऑक्टोबर महिन्यात ही विक्री रोडावली आहे.
जगभरात सेमीकंडक्टरची टंचाई गेल्या डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली होती. चिपच्या टंचाईमुळे कार उद्योगाच्या विक्रीमध्ये तब्बल ११० अब्ज डॉलरची घट होण्याची भीती वर्तवण्यात आली होती.
चिप एक पोर्ट डिव्हाईस आहे. त्याचा उपयोग डाटा ठेवण्यासाठी होतो. सोप्या शब्दात सांगायचे तर ऑटोमोबाइल्स इंडस्ट्रीपासून इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपर्यंत चिपच्या तुटवड्याचा सामान करत आहेत. इंफोटेनमेंट सिस्टिम, पॉवर स्टियरिंग आणि ब्रेकला ऑपरेट करण्यासाठी सेमीकंडक्टर चिपचा वापर होतो. नव्या वाहनांसाठी ही चिप खूप आवश्यक आहे. ही एक लहान चिप आहे. जिचा वापर कारमध्ये होतो.
जगातील काही सर्वात मोठ्या चिप निर्मात्यांसाठी चालू वर्ष खूप दबाव असणारे असणार आहे. कोरोनाच्या संकटांमुळे निर्मितीवर परिणाम झाला आहे. मात्र आता चिपच्या वाढत्या मागणीला कसे पूर्ण करता येईल हे मोठे आव्हान होते. या चिपची निर्मिती तैवानमध्ये केली जाते. त्यामुळे जगभरातील मोठ्या कंपन्या ह्या तैवानवर अवलंबून आहेत.