China's Political Situation: चीन मोठ्या राजकीय संकटाकडे! दशकापासून दुर्लक्षित पंतप्रधान अॅक्शनमध्ये; एकेकाळी राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:41 PM2022-06-01T17:41:23+5:302022-06-01T17:41:54+5:30
China Political Situation: चीनमधील रोजगार, उत्पादन ठप्प झाले आहे. लोक गेल्या दोन महिन्यांपासून लोक घरांमध्ये बंदिस्त आहेत. अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. यामुळे जिनपिंग विरोधकांना बळ मिळू लागले आहे.
बिजिंग: चीनमध्ये सध्या झिरो कोव्हिड पॉलिसीमुळे जनता बेहाल आहे. जवळपास दोन महिन्यांनी आज शांघायमधील चिनी नागरिकांना घराबाहेर पडण्याची सूट देण्यात आली. परंतू या काळात चीनची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. यामुळे तिथे मोठे राजकीय संकट निर्माण होण्याची शक्यता असून गेल्या १० वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दुर्लक्षित केलेल्या पंतप्रधानांनी त्याचे संकेत दिले आहेत.
गेल्याच आठवड्यात चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी 1,00,000 सरकारी अधिकाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत. जिनपिंग यांची कोरोना निती फेल होताना दिसत असताना ली सक्रीय झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
चीनमधील रोजगार, उत्पादन ठप्प झाले आहे. लोक गेल्या दोन महिन्यांपासून लोक घरांमध्ये बंदिस्त आहेत. जबरदस्तीने लोकांना पकडून कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यांना कोविड सेंटरमध्ये कोंडण्यात येत आहे, असे अल जझीराने आपल्या वृत्तात म्हटले आहे. चीनचे पंतप्रधान ली यांना गेल्या दोन कार्यकाळापासून सत्तेतून दुरूच ठेवण्यात आले आहे. अनेकांना चीनचा पंतप्रधान कोण हे देखील माहिती नाही, एवढी त्यांची ओळख, प्रसिद्धी दाबली जात आहे. चीनच्या दुसऱ्या शक्तीशाली पदावर असूनही त्यांना विचारात घेतले जात नाही.
ली यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक फक्त चिनी कम्युनिस्ट पार्टीमध्येच चिंतेची नाही तर चीनमधील भविष्यातील राजकीय संकटाचे संकेत देत आहे. ली हे कधीकाळी राष्ट्रपती पदाचे प्रबळ दावेदार होते. ते माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांच्या गटाचे होते. मात्र ली केकियांग यांना एक दशकभरापूर्वी पंतप्रधान बनविण्यात आले आणि बाजुलाच ठेवण्याचे कट रचले गेले.
चायना नीकन न्यूजलेटरचे सह संस्थापक एडम नी यांनी सांगितले की, ली अचानक पुन्हा चर्चेत आले आहेत. यावरून चीनच्या सत्ताधाऱ्यांचे काही गट हे शी जिनपिंग यांचा तिसरा कार्यकाळा आणि त्यांच्या झिरो कोविड नितीवरून चिंतेत आहेत हे दिसते. ट्रिवियम चाइनाचे पार्टनर ट्रे मॅकआर्वर नुसार शी यांच्या अपयशामुळे ली यांना ताकद मिळणार आहे.