आश्चर्यच! चीनने बनवली मन वाचणारी मशीन, तुमच्या मनात काय चाललंय? सेकंदात समजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:27 IST2025-01-04T11:26:54+5:302025-01-04T11:27:27+5:30
China Mind Reading Machine: चिनी स्टार्टअप न्यूरोस्पेसने गुरुवारी आपल्या दोन यशस्वी शोधांची घोषणा केलली आहे. कंपनीच्या ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) डिव्हाइसने समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे अचूक ओळखले.

आश्चर्यच! चीनने बनवली मन वाचणारी मशीन, तुमच्या मनात काय चाललंय? सेकंदात समजणार
मागच्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनने मोठी झेप घेतली आहे. अमेरिका, जपान आणि युरोपमधील विकसित देशांसमोर या क्षेत्रात चीनने मोठं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, चिनी स्टार्टअप न्यूरोस्पेसने गुरुवारी आपल्या दोन यशस्वी शोधांची घोषणा केलली आहे. कंपनीच्या ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) डिव्हाइसने समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे अचूक ओळखले. तसेच दुसऱ्या चाचणीमध्ये मेंदूतील इशाऱ्यांवरून चिनी भाषेचा निर्धारित वेळात उलगडा केला. या दोन शोधांमुळे चीनने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
याबाबत समोर आलेल्या अधिक माहितीनुसार बीसीआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती आपल्या मेंदूचा वापर करून सॉफ्टवेअर कंट्रोल करू शकते. वस्तू हलवू शकते. एआय मॉडेल्ससोबत चर्चा करू शकते. तसेच बोलताना डिजिटल अवताराला कंट्रोल करू शकते.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात शांघाई येथील फुडान युनिव्हर्सिटीशी संबंधित हुआशान रुग्णालयातील न्यूरोसर्जन्सनी एका २१ वर्षीय महिला रुग्णाच्या डोक्यामध्ये एक लवचिक बीसीआय डिव्हाइस इन्स्टॉल केला. हा डिव्हाईस रुग्णाच्या डोक्यातील ट्युमरला दुरुस्त करण्यासाठी लावण्यात आला होता. न्यूरोएक्सनुसार त्यांच्या टीमने रुग्णाच्या डोक्यातून हाय-गामा बँडचे इलेक्ट्रोकोर्टीकोग्राम (ECoG) सिग्नल काढले. तसेच त्यांना समजून घेण्यासाठी एक न्यूरल नेटवर्क मॉडेल तयार केलं. या तंत्रज्ञानाने ६० मिलिसेकंदांपेक्षा कमी वेळात अचून निष्कर्ष समोर ठेवले. तसेच ऑपरेशनला काही मिनिटे झाली असतानाच मेंदूच्या कार्यात्मक क्षेत्रांचा नकाशा तयार केला.
त्याबरोबरच मेंदूच्या इशाऱ्यांमधून भाषा समजणं हे बीसीआय तंत्रज्ञानाचं खास वैशिष्ट्य आहे. मेंदूंच्या इशाऱ्यावर भाषा समजणे बीसीआय तंत्रज्ञानाला बनवण्याचा एक रोमांचक अनुभव आहे. डिसेंबर महिन्यात एका टीमने चिनी भाषणाला सिंथेसाइझ करण्यासाठी लवचिक बीसीआयचं पहिलं क्लिनिकल परीक्षण केलं. या परीक्षणमध्ये एका महिलेच्या मेंदूमध्ये २५६-चॅनेलचा बीसीआय डिव्हाइस लावला. या महिला रुग्णाला मिरगीचा त्रास होता. तसेच तिच्या मेंदूमधील भाषेच्या क्षेत्रात एक ट्युमर होता. मात्र हा डिव्हाइस लावल्यानंतर या महिला रुग्णाने पाच दिवसांच्या आत ७१ टक्के भाषण डिकोडिंगबाबत अचूकता मिळवली. हे डिकोडिंग १४१ सामान्य चिनी अक्षरे सेटवर आधारित होती. त्यामध्ये एक अक्षर समजण्यासाठी १०० मिलिसेकंदांपेक्षा कमी वेळ लागला.