चीनचा आता जगाच्या मीडियावर ‘कंट्रोल’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 08:17 AM2023-10-17T08:17:48+5:302023-10-17T08:17:59+5:30
जगात जिथून आणि जो काही फायदा आपल्याला मिळवता येईल त्यासाठी चीन कायम हपापलेला असतो. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची ...
जगात जिथून आणि जो काही फायदा आपल्याला मिळवता येईल त्यासाठी चीन कायम हपापलेला असतो. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. पृथ्वीवर म्हणजेच जगातल्या जमिनीवर कब्जा मिळविण्याचा सपाटा तर त्यांनी लावलेला आहेच, त्याचबरोबर पाण्यात म्हणजे समुद्रावरही आपलीच सत्ता असावी, यासाठी त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा वापर कायमच केला आहे. एवढंच नाही, अंतराळातही आधी पोहोचून तेथे आपला ‘झेंडा’ गाडण्याची म्हणजेच अंतराळातली जागाही आमचीच असा हडेलहप्पीपणाही त्यांनी सुरू केला आहे.
चीनच्या या विस्तारवादी धोरणापासून जगानं सावध राहावं यासाठीचा इशाराही अलीकडच्या काळात अमेरिकेनं वारंवार दिला आहे. ‘दोस्त’ म्हणवून मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे धोकादायक आणि विश्वासघातकी कारनामेही चीननं वारंवार केले आहेत. शेजारच्या अनेक देशांना चीननं असंच फशी पाडलं आहे भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्ताननं चीनला गळामिठी मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण ही गळामिठी त्यांच्यासाठीही गळफासच ठरली आहे. त्याचं एक नवं रूप नुकतंच समोर आलं आहे.
ज्या पाकिस्ताननं चीनवर ‘दोस्त’ म्हणून विश्वास टाकला, त्याच पाकिस्तानला दिवाळखोर बनविण्यात चीनचा मोठा हातभार आहे. आता तर पाकिस्तानच्या मीडियावरही आपला पूर्ण कंट्रोल असावा, यासाठीचे छुपे कारनामे चीननं कधीचेच सुरू केले आहेत. यासाठी चीननं पाकिस्तानविरुद्ध थेट आंतरराष्ट्रीय कारवायांचं जाळंही विणलं आहे. पाकिस्तानचा मीडिया आणि तिथली माध्यमं आपल्याच म्हणजेच चीनच्याच बाजूनं बोलतील, आपलीच री ओढतील यासाठी चीन पैशांच्या राशी ओतत आहे. या वृत्ताला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानंही अलीकडेच दुजोरा दिला आहे. केवळ पाकिस्तानच नाही, तर ज्या-ज्या देशांचे त्यांचे ‘चांगले’ संबंध आहेत, त्या प्रत्येक देशाला प्रसारमाध्यमांच्या रूपानं आपला बटिक बनविण्याचे त्यांचे कारनामे आता उघडकीस आले आहेत. पाकिस्तानला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे आणि बसतो आहे.
यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं एक अहवालच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटलं आहे, संपूर्ण जगात ज्या बातम्या शेअर केल्या जातात, त्यात हेराफेरी करण्यासाठी, त्या बातम्या आपल्या बाजूूला वळविण्यासाठी आणि समजा त्या बातम्या आपल्या देशाची प्रतिमा खराब करणाऱ्या असतील, तर त्याही आपलं कौतुक करणाऱ्या कशा होतील, यासाठी चीन अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे.
चीन असंही आपल्या देशातल्या सर्व बातम्या सेन्सॉर करतो. देशातील कम्युनिस्ट पार्टी, चीन सरकार यांच्याविरोधात एकही बातमी प्रसारित होणार नाही, यासाठी चीन डोळ्यांत तेल ओतून पहारा देत असतो, पण हाच प्रकार त्यांनी आता देशाबाहेर, संपूर्ण जगात सुरू केला आहे. आपल्या देशाची सकारात्मक आणि चांगली प्रतिमा लोकांसमोर जावी, यासाठी त्यांनी अक्षरश: जोरजबरदस्ती सुरू केली आहे. पैशांची खैरात ओतून जगात अक्षरश: खोट्या बातम्या पेरायला सुरूवात केली आहे.
तैवान, मानवी हक्क अधिकार, साऊथ चायना सी... आदी गोष्टींबाबत चीननं कायमच दडपशाही केली आहे त्यामुळे संपूर्ण जगातच त्यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. ही प्रतिमा उजळावी, यासाठीही त्यांनी जगात वेगवेगळी ‘ऑपरेशन्स’ सुरू केली आहेत. त्यासाठी पत्रकारांना लाच देण्यापासून तर जे पत्रकार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीत, त्यांना ‘गायब’ करण्याचे जुने फंडे त्यांनी इथेही वापरायला सुरूवात केली आहे. हाच प्रकार चीन त्यांच्या देशात तर गेल्या कित्येक वर्षांपासून अमलात आणतो आहे. आपल्याला अडचणीच्या ठरणाऱ्या स्वत:च्याच देशाच्या परराष्ट्र मंत्र्यालाही ‘गायब’ करण्याची ‘जादू’ चीननं केली आहे.
चीन एकीकडे पाकिस्तानशी सहकार्याच्या गप्पा मारत आहे. आपल्या दोन्ही देशांबाबत जगामध्ये जो ‘दुष्प्रचार’ सुरू आहे, तो आपण दोघे मिळून ‘निपटून’ काढू असं सांगताना दुसरीकडे पाकिस्तानचाच मीडिया ‘ताब्यात’ घेण्याचाही त्यांचा उद्योग सुरू आहे.
‘मित्रा’चा दोरीनं गळा कापण्याचा उद्योग!
पाकिस्तान आणि चीनची जगात बदनाम झालेली प्रतिमा सुधरविण्यासाठी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मीडिया फोरमचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. ज्या गोष्टींना ते आपल्याविरुद्धचा दुष्प्रचार मानतात, तो मुळातूनच खणून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकीकडे त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याचा मुख्य वापर चीन स्वत:च्या फायद्यासाठीच करतो आहे. दुसरीकडे पद्धतशीरपणे पाकिस्तानचा दोरीनं गळाही कापत आहे! विविध ठिकाणचे अहवाल सध्या तरी तेच सांगताहेत!