UNSC मधील भारताच्या सदस्यत्वाचं नेपाळकडून समर्थन; चीनचा जळफळाट
By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 11:00 AM2021-01-17T11:00:17+5:302021-01-17T11:02:18+5:30
नेपाळच्या वक्तव्यानंतर चीननं व्यक्त केली होती नाराजी
नेपाळनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यात्वाचं समर्थन केलं आहे. यानंतर चीननंनेपाळसंदर्भात आपली नाराजी जाहीर केली. नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली हे गुरूवारी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यानंतर ग्यावली यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेटही घेतली.
या भेटीदरम्यान भारत आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडली. परंतु ज्यावेळी माध्यमांमध्ये नेपाळद्वारे युएनएससीमध्ये भारताच्या स्थायी सदस्यात्वाला समर्थन देण्याचं वृत्त झळकलं, त्याच दिवशी संध्याकाळी चीनच्या राजदुतांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतली. तसंच त्यांनी याबद्दल आपली नाराजीही व्यक्त केली.
हस्तक्षेप स्वीकारणार नाही
"नेपाळ आपल्या देशांतर्गत राजकारणात कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नाही. आपल्या अंतर्गत समस्यांचं निराकरण करण्यासाठी नेपाळ सक्षम आहे," असं ग्यावली म्हणाले. नेपाळची संसद भंग केल्यानंतर शेजारी देशात उपस्थित झालेल्या राजकीय संकटातील चीनच्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर ग्यावली यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.
दोन्ही देशांतील सीमाप्रश्नावर बोलताना ग्यावली यांनी भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश त्याचा तोडगा काढण्यासाठी सक्षम असून त्यावर विचारही सुरू असल्याचं म्हणाले. "भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत आपले संबंध चांगले आहेत. दोन्ही देशांसोबत असलेल्या संबंधांची आपण तुलना करणार नाही," असंही ते म्हमाले. यावेळी ग्यावली यांना चीनकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांविषयी प्रश्न विचारण्यात आला. "आम्ही देशांतर्गत राजकारणात कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नाही. आम्ही आमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सक्षम आहोत. शेजारी देश असल्यामुळे काही चिंता किंवा प्रश्न असू शकतात. परंतु आम्हाला कोणाचाही हस्तक्षेप मंजुर नाही," असंही ते म्हणाले.