चीन केवळ धमक्या देतो, हल्ला करायची हिम्मत नाही; या छोट्याशा देशानं केलीय ड्रॅगनची हवा टाइट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:00 IST2024-08-30T17:59:17+5:302024-08-30T18:00:17+5:30
जगातील काही प्रमुख शक्तीशाली देशांपैकी एक असलेला चीन शेजारील तैवानवर सातत्याने आपला अधिकार सांगत असतो. तैवान हा आपलाच भाग ...

चीन केवळ धमक्या देतो, हल्ला करायची हिम्मत नाही; या छोट्याशा देशानं केलीय ड्रॅगनची हवा टाइट!
जगातील काही प्रमुख शक्तीशाली देशांपैकी एक असलेला चीन शेजारील तैवानवर सातत्याने आपला अधिकार सांगत असतो. तैवान हा आपलाच भाग आहे आणि तैपेईला बीजिंगच्या आधीन आणण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, असे चीन मानतो. तर दुसऱ्या बाजूला, आपण एक स्वतंत्र देश आहोत असे तैवान मानतो आणि चीनच्या दाव्याचा विरोध करतो. सध्या अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन बिजिंग दौऱ्यावर आहेत. दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार करत, अमेरिकेने तैवानच्या चीनमधील शांततापूर्वक विलिनीकरणाचा स्वीकार करून त्यासाठी समर्थन द्यायला हवे, असे म्हटले आहे.
यावर, आता तैवानने पुन्हा एकदा आपला पक्ष ठेवत मोठे विधान केले आहे. चीन केवळ धमकी देतो. त्यांच्यात हल्ला करण्याची हिंमत नाही, असे तैवानने म्हटले आहे. हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना एक प्रकारचे खुले आव्हानच मानले जात आहे.
तैवानचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, तैपेईवर संपूर्ण शक्तीने हल्ला करण्याची चीनची क्षमता नाही. कारण तसे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी संसाधनं नाहीत. यामुळे शेजारी देश प्रगत शस्त्रे एकत्रित करत आहे. एवढेच नाही तर, चीनकडे तैवानला धमकावण्यासाठी इतरही पर्याय आहेत, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, चीन लोकशाही असलेल्या तैवानला आपला भाग मानतो. आपल्या दाव्याला आणखी बळकटी देण्यासाठी, बीजिंगने गेल्या पाच वर्षांत लष्करी आणि राजकीय दबाव वाढवला आहे. तर दुसरीकडे, तैवान प्रत्येक व्यासपीठावर आणि संधी मिळेल तेथे चीनचा हा दावा ठामपणे फेटाळत असतो.