चीन की अमेरिका? पडले दोन गट; लोकशाही आणि निरंकुशता यापैकी एक निवडण्याची वेळ : पेलोसी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 07:00 AM2022-08-04T07:00:16+5:302022-08-04T07:00:34+5:30
नॅन्सी पेलोसी या दीर्घकाळापासून चीनच्या टीकाकार राहिल्या आहेत. १९९१ च्या बीजिंगच्या भेटीदरम्यान, पेलोसी यांनी तियानमेन स्क्वेअरवर जात एक बॅनर फडकवला. यावर लिहिले होते, चीनमध्ये लोकशाहीसाठी मरणाऱ्यांसाठी.
बीजिंग : अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावरून त्यांना आपल्या देशातून मोठे समर्थन मिळत आहे. तसेच, जगभरातील अनेक देशांनी पेलोसी यांच्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे. तथापि, चीनच्या सहकारी देशांनी चीनला पाठिंबा दिला आहे. यावरून या दोन देशांचे समर्थकही दोन गटात विभागले गेले आहेत.
तैवान हा आपला भाग असल्याचा दावा चीन करत आलेला आहे. पेलोसी यांच्या दौऱ्यावरून चीन आणि अमेरिका यांचे सहकारी देश दोन गटात विभागले गेल्याने चीनचा वाढता जागतिक प्रभाव अधोरेखित होत आहे. अर्थात, अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाने पेलोसी यांच्या दौऱ्याचे खुले समर्थन केलेले नाही. बायडेन यांनी म्हटले आहे की, तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या काळात हा दौरा योग्य विचार नव्हता.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनी पेलोसी यांच्या दौऱ्यावर कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही अशा काळातून जात आहोत, जिथे आमच्या क्षेत्रात तणाव वाढला आहे. चीनने या क्षेत्रात अधिक आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र, तैवानबद्दल आम्हाला असे वाटते की, आहे त्या परिस्थितीत बदल करायला नको. जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाजु मात्सुनो यांनीही पेलोसी यांच्या दौऱ्यावर सावध भूमिका घेतली आहे. अर्थात, सागरी क्षेत्रात चीनच्या सैन्य सरावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाने पेलोसींच्या दौऱ्यावर टीका करताना अमेरिकेच्या भूमिकेमुळे क्षेत्रातील शांतता धोक्यात आल्याचे म्हटले आहे.
अमेरिका तैवानला एकटे सोडणार नाही
अमेरिका तैवानला एकटे सोडणार असे अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले आहे. पेलोसी यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने तैवानमध्ये अनेक नेत्यांशी चर्चा केली. तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर पेलोसी यांनी म्हटले आहे की, आज जगासमोर लोकशाही आणि निरंकुशता यातील एक निवडण्याचे आव्हान आहे. तैवान आणि जगात सर्वत्र लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. दरम्यान, तैवानचा आपला दौरा पूर्ण करून पेलोसी या दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या. त्यानंतर त्या सिंगापूर, मलेशिया आणि जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
तैवानवर आर्थिक निर्बंध लादले
चीनने तैवानला नैसर्गिक वाळू पुरवण्यावर बंदी घातली आहे. यामुळे तैवानचे खूप नुकसान होऊ शकते. कोरोना महामारीपासून बांधकाम आणि पायाभूत सुविधांचा विकास तैवानसाठी उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. अशा स्थितीत वाळूची निर्यात बंद केल्याने तैवानचे आर्थिक नुकसान होणार आहे. चीनचे उपपरराष्ट्र मंत्री झी फेंग यांनी अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांना बोलावले आहे. पेलोसीच्या तैवान भेटीचे गंभीर परिणाम होतील, असे फेंग म्हणाले.
अमेरिकेला थेट धमकी-जे आगीशी खेळतील, ते जळतील
चीनला घेरण्यासाठी अमेरिका तैवानचा वापर करत असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले. अमेरिका ‘वन चायना पॉलिसी’ला आव्हान देत आहे. अमेरिकेचा हा दृष्टिकोन आगीशी खेळण्यासारखा असून, तो अत्यंत घातक आहे. जे आगीशी खेळतात, ते स्वतःला जाळून घेतात, असे चीनने म्हटले आहे.
चीनला पेलोसी का
आवडत नाहीत?
नॅन्सी पेलोसी या दीर्घकाळापासून चीनच्या टीकाकार राहिल्या आहेत. १९९१ च्या बीजिंगच्या भेटीदरम्यान, पेलोसी यांनी तियानमेन स्क्वेअरवर जात एक बॅनर फडकवला. यावर लिहिले होते, चीनमध्ये लोकशाहीसाठी मरणाऱ्यांसाठी. तियानमेन स्क्वेअर हे तेच ठिकाण आहे जिथे १९८९ मध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत होते आणि लष्कराने त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
चीनने राजदूतांना केले पाचारण
अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर तणाव वाढला असून, चीनने अमेरिकी राजदूतांना पाचारण करून यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीनने इशारा दिला आहे की, अमेरिकेला त्यांच्या चुकांची किंमत मोजावी लागेल. पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे संतप्त झालेल्या चीनने तैवानच्या हवाई हद्दीजवळ अनेक विमानांचे उड्डाण केले आणि तैवाननजीक सैन्य सराव केला.